उत्सवपुणेमहाराष्ट्र

मांजरी, वाघोलीत ढोल ताशांच्या तालावर सर्जा राजाच्या मिरवणुका..

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.२१ : मांजरी खुर्द(ता.हवेली) येथील शेतकऱ्यांनी भाद्रपद अमावस्येला बैलांची रंगरंगोटी करून मांजरी खुर्द गावातून ढोल ताशा, डि जे व पारंपारिक वाद्यामध्ये फटाक्यांची आतिषबाजी व भंडाऱ्याची उधळण करत मोठ्या उत्साहात मिरवणुका काढून बैलपोळा सण साजरा केला. हा दिवस बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचे मत पोलीस पाटील भारती उंद्रे, बापूसाहेब पवार,सुदाम उंद्रे,संजय उंद्रे यांनी सांगितले. गावच्या रुढी परंपरेनुसार पोलीस पाटील यांच्या बैलांची प्रथम मिरवणूक काढली जाते व नंतर इतर शेतकरी आपल्या बैलांची मिरवणूक काढतात. मांजरी खुर्द येथे आजही ही परंपरा कायम आहे.
आधुनिक बदलामुळे शेती कामासाठी बैलांचे महत्त्व कमी झाले असले तरी अजूनही काही हौशी शेतकरी बैलांची जीवापाड जपणूक करीत असल्याचे दिसत आहे. शेती कामाबरोबरच बैलगाडा स्पर्धेसाठी बैलांचा जास्तीत जास्त उपयोग शेतकरी करीत आहेत.
सध्या चांगला पाऊस झाल्याने शेतकरी राजा समाधानी झाला असून आपल्या जिवापाड जपलेल्या बैलांची पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढुन मनोभावे पूजा केली. बैलांना सकाळी नदीवर किंवा ओढ्यात नेऊन आंघोळ घातली. या दिवशी बैलांच्या खांद्याना हळद आणि तूपाने शेकतात. पाठीवर रंगाने नक्षीकाम करुन झूल, संपूर्ण अंगावर गेरूचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात फुलांच्या व कवड्या, घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे किंवा करदोड्याचे तोडे घातले होते. त्याला खायला गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य दिला. तसेच बैलाची निगा राखणाऱ्या बैलकरी घरगड्यास नवीन कपडे दिले.
या दिवशी बैलाला सजवून गावभर मिरवणुक काढली. या सणाच्या दिवशी गावात मंदिराला व घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले होते. बैल जोड्या गावातून मिरवणुकीने ग्रामदैवत, मारुती मंदिर ,महादेव मंदिरात नेल्या.शेतकरी वर्गात हा सण विशेष महत्त्वाचा मानला जातो.
सायंकाळी मोठ्या आनंदात मिरवणुका काढण्यात आल्यानंतर महिलांनी आपल्या सर्जा राजाला औक्षण करून त्याला पुरणपोळीचा नैवेद्याचा घास भरून हा सण मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा केला. यावेळी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले होते.या मिरवणुकी दरम्यान तरुणांनी डि जे व ढोल ताशांच्या तालावर नाचत हा बैलपोळा सण मोठ्या आनंदात साजरा केला. शेतकरी अमित भोसले, बापूसाहेब पवार,दर्शन उंद्रे,उत्तम उंद्रे, दत्तात्रय दगडे,अक्षय पवार, राहुल थोरात, महेश मोडक इत्यादी शेतकऱ्यांनी आपापल्या सर्जा राजाची सवाद्य मिरवणूक काढून त्यांचे पूजन केले.
यादरम्यान वाघोली पोलीस स्टेशनच्या वतीने पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Spread the love

Related posts

आमदार कटके यांनी घेतली पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांची भेटनगर महामार्गावरील वाहतुक कोंडी व आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर केली चर्चा..

admin@erp

अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या हवेली तालुका अध्यक्ष पदी बापूसाहेब कंद तर उपाध्यक्षपदी सचिन उंद्रे

admin@erp

मांजरीत पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा

admin@erp