पुणे

प्रभाग १५ – मांजरी बुद्रुक-केशवनगर-साडेसतरानळी..

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

चार वर्षापूर्वी नव्याने पालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांपैकी मांजरी बुद्रुक व शेवाळेवाडी या गावांबरोबरच सात वर्षांपूर्वी समाविष्ट झालेल्या केशवनगर व साडेसतरानळी या चार गावांचा मिळून या प्रभागाची निर्मिती झाली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, द्राक्ष संशोधन केंद्र व फुल संशोधन केंद्र अशा राष्ट्रीय पातळीवरील संस्था, जागतिक स्तरावर नावाजलेली सिरम इन्स्टिट्यूट तसेच ॲमॅनोरा सिटी सारख्या शहराचा अंतर्भाव असलेल्या प्रकल्पांचा या प्रभागात समावेश होतो. याशिवाय कै. अण्णासाहेब मगर विभागीय बाजार समिती, ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, कृषी विद्यालय, सुभाष सामुदायिक सोसायटी, साडेसतरानळी येथील वन संशोधन केंद्रही येथे आहे. काहीशी शेती, गायरान, वनविभाग व नागरी वस्ती अशा प्रमाणात सुमारे अडीच-तीन हजार हेक्टर क्षेत्रावर हा प्रभाग विस्तारलेला आहे.

महापालिकेतील समावेशानंतर प्रभागातील या गावांमधील पायाभूत सुविधांसह येथील अनेक विकास कामे खोळंबली आहेत. या चारही गावात मोठ्या प्रमाणात नागरिकरण वाढले आहे. सुमारे दहा झोपडपट्टी वसाहती, गावठाण व सोसायटी यांनी हा प्रभाग व्यापलेला आहे. दोन लाखांच्या वर लोकसंख्या येथे आहे. मांजरी बुद्रुक परिसरातून गेलेला सोलापूर महामार्ग व अंतर्गत रस्ते कायमच वाहतूक कोंडीत अडकलेले असतात. प्रभागातील प्राथमिक शाळा दुरावस्थेत आहेत. स्मशानभूमी विकास रखडलेला आहे. दफनभूमी नाही. अद्यापही आजूबाजूला कचऱ्याचे ढीग लागत आहेत. वीज व पाणीपुरवठा अपुरा तसेच विस्कळीत आहे.

केशवनगरमध्ये मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते कायम कोंडीत असतात. शहरातील गोठे, कुंभारवाडा असे पुनर्वसन प्रकल्प असविधांच्या गर्तेत आहेत. दोन-तीन कचरा प्रकल्प या गावाच्या माथी मारलेले आहेत. खराडी केशवनगर पुलाचे काम अंतिम टप्प्यात रखडले आहे. साडेसतरानळी, शेवाळवाडी गावांसह चारही गावांचे वीज वितरण, पाणीपुरवठा अपुरा आहे. परिसरातून गेलेला बेबी कालवा कचऱ्याचे आगार बनला आहे. कालव्यालगतचा रस्ते विकास रखडला आहे. त्यामुळे या चारही गावांचा गेली चार वर्षांपासून रखडलेल्या विकासाला गती मिळण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

चतु:सीमा
पूर्व – मुळा मोठी मुठा नदीपासून दक्षिणेकडे भाऊरावस्ती पर्यंत कदम वाकवस्ती व प्रभागाला विभागणारा ओढा
दक्षिण – शेवाळेवाडी ते लक्ष्मीकॉलनी पर्यंतचा भाग
पश्चिम – प्रभाग क्रमांक १६ ची मगर महाविद्यालयापर्यंतची हद्द. पुढे श्रीराम इन्स्टिट्यूट ते ॲमॅनोरा टाऊनशिप पासून केशवनगर मुळा-मुठा नदीपर्यंत
उत्तर – मुळा मुठा नदीने मांजरी बुद्रुक नदी पुलापर्यंत

समाविष्ट भाग
केशवनगर गावठाण, लोणकर वस्ती, साडेसतरानळी, ॲमॅनोरा पार्क टाउन, साठे वस्ती, महादेवनगर, घुले वस्ती, गोपाळपट्टी, चारवाडा, मुंढवा मांजरी रोड, झेड कॉर्नर, अनाजी वस्ती, माळवाडी वसाहत, मांजरी गावठाण, भापकर मळा, मोरे वस्ती, मांजरी फार्म, हाक्के नगर, झगडे वस्ती, भवरा वस्ती, शेवाळेवाडी, भंडलकर नगर, मांजरी ग्रीन, पुणे सोलापूर महामार्ग, कुमार मिडोज, अमरसृष्टी सोसायटी

प्रमुख समस्या

  • अपुरा पाणीपुरवठा : प्रभागातील चारही गावात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. आहे कुठे दिवसाआड तर कुठे चार-पाच दिवसांनी पुरवठा होतो. मांजरी-मुंढवा रस्ता, केशवनगर, साडेसतरानळी या भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई. उन्हाळ्यात विकतच्या टॅंकरने पाणी घ्यावे लागते. सोसायट्यांना त्यासाठी मोठा खर्च होतो.
  • वाहतूक कोंडी : सोलापूर महामार्गावर फुरसुंगी फाटा, शेवाळेवाडी फाटा, विभागीय बाजार समिती, केशवनगर-मांजरी रस्ता, अण्णासाहेब मगर महाविद्यालय चौक, साडेसतरानळी रेल्वे फाटक आदी ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होते.
  • धोकादायक शाळा : भवरावस्ती, शेवाळेवाडी, भापकर मळा, गोपाळपट्टी, अनाजी वस्ती, साधुनानावस्ती, घुले वस्ती या पालिका शाळा थेट रस्त्यालगत असल्याने अपघाताचा धोका.
  • अरुंद रस्ते : शेवाळवाडी मुख्य रस्ता, भापकर मळा ते मांजरी गावठाण रस्ता, दरडीचा रस्ता, साडेसतरानळी-केशवनगर व केशवनगर चौक ते मांजरी रस्ता, महादेवनगर आदी भागातील अंतर्गत रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी.
  • सांडपाणी वाहिन्यांचा अभाव : जुन्या व अपुऱ्या सांडपाणी वाहिन्या असल्याने रस्त्यावर पाणी ओसंडून वाहण्याचे प्रमाण मोठे. अनेक वाहिन्या थेट ओढ्यात व ओढ्यातून थेट नदीत मिळतात. काही भागातील वाहिन्या बेबी कालव्यात सोडलेल्या आहेत.
  • रस्त्यावरील व्यावसायिक अतिक्रमणे : पुणे-सोलापूर महामार्ग, महादेवनगर-मांजरी रस्ता, मांजरी-केशवनगर रस्ता, साडेसतरानळी -पाईपलाईन रस्ता या भागात भाजीपाला फळ विक्रेते व दुकानदारांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात आहे.
  • अनाधिकृत वाहनतळे : या संपूर्ण प्रभागात कोठेही अधिकृत पार्किंग व्यवस्था नाही. सम विषम पार्किंगही नाही. त्यामुळे सर्वच प्रमुख रस्त्यावर दोन्ही बाजूला अनधिकृतपणे वाहने पार्क केली जात आहेत.
  • कचरा प्रश्न : फुरसुंगी फाटा ते भापकर मळा, पुढे गावठाण, मोरे वस्ती रस्ता, फुरसुंगी रस्ता, दरडी रस्ता, घुले वस्ती ते साडेसतरानळी रस्ता, साडेसतरानळी-केशवनगर रस्ता, रंगीचा ओढा, मुळामुठा काठ व बेबी कालवा परिसरात ठीक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसतात.

कोठे काय

  • केशवनगर-मांजरी रस्ता, भापकर मळा, अनाजी वस्ती, दरडी, मगर महाविद्यालय मागील रस्ता, भवरावस्ती, शेवाळेवाडी, साडेसतरानळी-केशवनगर असे मुख रस्ते अरुंद
  • साडेसतरानळी झोपडपट्टी वसाहतीमध्ये वीज वाहिन्या धोकादायक व अपुरा पाणीपुरवठा आहे.
  • साडे सतरा नळी रेल्वे फटकावर वारंवार वाहतूक कोंडी, उड्डाणपुलाची गरज.
  • मुळा-मुठा नदीवरील खराडी-केशवनगर जोडणारा पूल, मांजरी रेल्वे उड्डाणपूल मुळामुठा नदीवरील नवीन पूलांची अंतिम टप्प्यातील कामे अपूर्ण
  • प्रभागातील चारही गावात सार्वजनिक स्वच्छतागृहांची वाणवा
  • पुणे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूला फळे, भाजीपाला विक्रेते व पथारी व्यवसायिकांचे अतिक्रमण
  • केशवनगर ओढ्यावरील पुलाचे रुंदीकरण रखडल्याने चौकात व पुलावर कोंडी
  • साडेसतरानळी-रासकर चौक रस्ता डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण नसल्याने दुरावस्थेत
  • गोपाळपट्टी, घुले वस्ती, भापकर मळा, भवरा वस्ती पालिका शाळांच्या इमारती धोकादायक
    •परिसरातून जाणारा बेबी कालवा व मुळा मुठा नदी काठ कचऱ्याच्या विळख्यात
    ……………………………..

प्रभाग १५ –
मांजरी बुद्रुक-केशवनगर-साडेसतरानळी
महिला मतदार – ५३२४२
पुरुष मतदार – ५९०९४
इतर – १०
एकूण मतदार – ११२३४६

Spread the love

Related posts

मांजरीत पिसाळलेल्या कुत्र्याचा दहा जणांना चावा

admin@erp

आमच्या हक्काचे पाणी आणि इतर मूलभूत सुविधा आम्हाला मिळाल्याच पाहिजे: आमदार बापूसाहेब पठारे…

admin@erp

भेकराईमाता विद्यालयात पालक मेळाव्याचे आयोजन…

admin@erp