पुणेमहाराष्ट्र

आरक्षणापुर्वीच इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग…

प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे

मांजरी ता.१२ : पुणे जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीला काही अवधी असुन अजून आरक्षण सोडतही काढलेली नाही,परंतु प्रभाग रचना जाहीर झाल्याने निवडणुकीसाठी उतावळलेल्या इच्छुकांनी आत्तापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. पुर्व हवेलीतील आव्हाळवाडी,मांजरी खुर्द,कोलवडी, थेऊर, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची इ.सर्व गावात दिवाळीनिमित्त मिठाई व साड्यांचे वाटप करायला सुरुवात केली आहे. इच्छुक उमेदवारांनी भेटीगाठी देऊन आपणच उमेदवार असल्याचे सांगत मतदारांना खुश केल्याची चर्चा नागरिकांच्या मध्ये आहे. एकंदरीत दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लोक भावना जिंकण्यासाठी उमेदवारांचा हा लोकसंपर्काचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसत आहे. निवडणुकीच्या या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवस हे दौरे अधिक वाढण्याची शक्यता आहे. यामुळे गावा गावातील हे स्वयंघोषित उमेदवार सक्रीय झाले आहेत. काही उमेदवारांनी तर मला उमेदवारी नाही मिळाली तर माझ्या पत्नीला उमेदवारी मिळेल अशा आशेने कामाला सुरुवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या गणेशोत्सव व नवरात्रौत्सव निमित्त आपल्या प्रभागांमध्ये येत असलेल्या मंडळांना भेटी देणे, आरती करणे, मंडळांना खुश करणे, असा दहा दिवस कार्यक्रम केला होता. त्याचप्रमाणे गावातील प्रमुख नेतेमंडळी कार्यकर्ते यांना शुभेच्छा भेट देऊन मी जिल्हा परिषद पंचायत समिती साठी इच्छुक उमेदवार असल्याचे सांगितले जात आहे.
दररोज आपल्या पद्धतीने प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. सध्या प्रचारासाठी मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे व्हॉट्स ॲप वर अनेकांना शेकडो मेसेज मनात नसतानासुद्धा वाचावे लागत आहेत. आपल्या भागातील कार्यकर्त्यांचा वाढदिवस असला की व्हाट्सअप, फेसबुक वरती व प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या जात आहेत.
तसेच काही इच्छुकांनी अष्टविनायक,उज्जैन, शिर्डी, कोल्हापूर, तुळजापूर आदी देवस्थानच्या यात्रा आयोजित करून मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न केला आहे. नागरिकांना नाष्टा,जेवणासह मोफत देव दर्शन होत असल्याने आलेली संधी सोडायची नाही असा निर्णय मतदार राजाने घेतला आहे. एकंदरीतच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या प्रभागातील मतदारांना भेटी देऊन निवडणुकीचे रणशिंग फुंकल्याचे दिसून येत आहे.

Spread the love

Related posts

भक्ती, विचार आणि समाजसेवेचा संगम म्हणजे — ‘अभंग तुकाराम’…

admin@erp

शिरूर हवेलीतील इच्छुकांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुलाखती…

admin@erp

अपघात रोखण्यासाठी अल्पकालीन उपाययोजना तातडीने अमलात आणा : केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

admin@erp