या निर्णयामुळे आधी नगरपरिषदांच्या निवडणुका होणार का, या चर्चेला आता अधिकच उधाण आले आहे.
प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
पुणे ता.२९: पुर्वनियोजित कार्यक्रमानुसार गट व गणांची अंतिम मतदार यादी सोमवारी (ता. 27) जाहीर होणार होती. मात्र, निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम पुढे ढकलत 12 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्यातील 32 जिल्हा परिषद व 336 पंचायत समित्यांच्या अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचा कार्यक्रम 15 दिवस पुढे ढकलला गेला आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम आयोगाने जाहीर केल्या. या निर्णयामुळे आधी नगरपरिषदांच्या निवडणुका होणार का, या चर्चेला आता अधिकच उधाण आले आहे.
मात्र इच्छुकांनी या निर्णयाची धास्ती घेत, इच्छुक उमेदवारांनी ‘वेट अँड वॉच’ धोरण स्वीकारले आहे.. जिल्हा परिषदेची निवडणूक पंधरा दिवस पुढे गेल्यानंतर अजूनही इच्छुकांनी चुप्पी साधली आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुका पुढे गेल्याने अनेक इच्छुकांनी आघाडी किंवा महायुतीबाबत आपला पवित्रा जाहीर करण्यास विलंब केला आहे. 12 नोव्हेंबरनंतरच या राजकीय समीकरणांची अधिक स्पष्टता मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
जिल्हा परिषद व नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने दोन्ही संस्थांचा प्रभाग व मतदार यादीचा कार्यक्रम समान पातळीवर सुरू होता. परंतु, पहिल्यांदा पालिका अंतिम मतदार यादीचा कार्यक्रम चार दिवस पुढे ढकलत 31 ऑक्टोबरची तारीख दिली. आता त्यापुढे जाऊन जिल्हा परिषदेची अंतिम यादी पंधरा दिवस पुढे ढकलली आहे.
नियोजित कार्यक्रमानुसार दोन्ही निवडणुका एकत्र होतात की काय, अशा चर्चा ही होत्या. परंतु, आज शेवटच्या दिवशीच आदेश काढून गट व गणाच्या अंतिम मतदार याद्यासाठी पंधरा दिवसांची मुदतवाढ दिल्याने आधी पालिका निवडणुका होतील, या चर्चेला उधाण आले आहे. प्रशासनातील काही अधिकारीसुद्धा या संकेताला दुजोरा देत असले, तरी आयोगाच्या नियोजनाबाबत कोणतीच कल्पना नसते, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना इच्छुकांना संबंधित प्रभाग किंवा मतदारसंघाच्या मतदार यादीत आपले नाव समाविष्ट असलेल्या पानाची झेरॉक्स प्रत जोडावी लागते. मात्र, हे पान अंतिम मंजुरीच्या यादीतील असावे लागते. त्यामुळे शक्यतो अंतिम मतदार यादीनंतरच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जात असल्याचा आजपर्यंतचा अनुभव काही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सांगितला.
परंतु, अंतिम यादी जाहीर झाल्यानंतरच निवडणूक लावावी, असा काही नियम नाही. अंतिम मतदार यादी जाहीर होण्याच्या काही दिवस आधीसुद्धा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जावू शकतो. परंतु, अशा शक्यतेत, यादी अंतिम झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांनी उमेदवारी अर्ज भरण्याचा कार्यक्रम सुरू केला जाऊ शकतो. त्यामुळे आयोगाचे नियोजन काय असणार, याची उत्सुकता कायम आहे.
तीन नोव्हेंबर रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील याद्या अधिप्रमाणित होतील, याच दिवशी या छापील मतदार याद्या माहितीसाठी ठेवण्यात आल्याची सूचना प्रसिद्ध होईल. 12 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्राची यादी व केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश आहेत. तसेच यादीतील दुबार नावांसंदर्भातील कार्यवाहीचे मार्गदर्शन स्वतंत्रपणे करण्यात येणार असून, त्यानुसार आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही केल्या आहेत. या घडामोडींमुळे सध्या राज्यात निवडणुकीच्या धुरळ्याची चाहूल लागली आहे आणि आधी पालिका, मग जिल्हा परिषद निवडणुका होतील, हे आता जवळपास निश्चित झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
