पोटच्या गोळ्याला फेकुन पसार झाली आई, महिला पोलिस बनल्या दायी
आई मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना
खराडी ता.१७: खराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ह्रदय पिळवटून टाकणारी, आई लेकराच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नुकतीच घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार ता.१४ रोजी सायंकाळच्या सुमारास आदर्श शाळेच्या शेजारी गल्ली नं. १ थिटे वस्ती, खराडी पुणे येथील राजेश रामचंद्र केदारी (वय ५४) यांच्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावर जिन्यामध्ये एक, एक दिवसाचे पुरुष जातीचे अर्भक असले बाबतची माहिती खराडी पोलिसांना मिळाली.
सदर माहिती मिळताच खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून याबाबत तात्काळ महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी बिडवे, मपोशि थोरात व मपोशि मालवंडे यांना घेऊन तात्काळ घटनास्थळी भेट दिली. सदर ठिकाणी एक दिवसाचे नवजात पुरुष जातीचे बालक जिन्यामध्ये बेवारसरीत्या टाकून दिलेल्या आढळून आले. सदर बालक ताजे जन्माला आलेले असल्याने पूर्णतः रक्ताने माखलेले होते. नाळीमधून रक्त येत होती एवढे असताना देखील सदर बाळ हे जिवंत होते. हा प्रकार पाहून खराडी पोलीस ठाण्याचे महिला व अधिकारी यांनी सदर बाळाला अलगद ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले.
या नवजात बालकाला पोलीस ठाण्यात आल्यानंतर मपोउपनि बिडवे व मपोशि गलांडे, मपोशि घुले, मपोशि डहाळे, गावडे, प्रतिमा पवार, मनीषा पवार यांनी त्याच्यावर तात्काळ प्राथमिक उपचार करून स्तनपान देऊन स्वतःकडील स्कार्फ मध्ये गुंडाळून त्यास मायेचे उपयोग जीवदान दिले. त्या बालकाला पुढील उपचारासाठी ससून हॉस्पिटल येथे ॲडमिट केले आहे. त्याच्यावर उपचार चालू केले असून बाळाची प्रकृती उत्तम आहे.
सदर घटनेबाबत खराडी पोलीस ठाणे येथे अज्ञात इसम/ महिला यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ९३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक माधुरी बिडवे या करीत असुन या अज्ञात इसम/ महिला यांचा शोध पोलीस घेत आहेत.
सदरची कामगिरी ही मनोज पाटील, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, पोलीस उपायुक्त, परिमंडळ ४ हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर सपोनि मुबारक शेख, मपोउपनि माधुरी बिडवे, मपोहवा ४९४९ / नाईक , मपोशि थोरात, मपोशि मालवडे, सपोशि घुले,मपोशि डहाळे, मपोशि प्रतिमा पवार, मपोशि मनीषा पवार, मपोशि गावडे यांनी केली आहे.