प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी परिसरात थाटामाटात गौरी पुजन
मांजरी ता.२ : सोन्याच्या पावली गौराई घरी आली,
आगमनाने तिच्या संध्या चैतन्याने न्हाली!
मांजरी खुर्द व परिसरात गणपती पाठोपाठ पाचव्या दिवशी रविवार (ता.३१) रोजी घरोघरी जेष्ठा गौरींचे आगमन मोठ्या उत्साहात आनंदाच्या वातावरणात झाले. महिलांनी गौरी आगमनासाठी केलेली आकर्षक सजावट आणि विविध लक्षवेधी देखावे गौरी गणपतीच्या सणाचा उत्साह वाढवत आहे. गौरी आगमनाच्या सोहळ्यानंतर गौरीचे पूजन करून त्यांना भाजी भाकरीचा व फराळाचा नैवेद्य दाखवून मनोभावे प्रार्थना करण्यात आली.
भाद्रपद शुद्ध सप्तमीला अनुराधा नक्षत्रात गौरी आव्हान केले जाते ती एकटी येत नाही तर त्या दोघी बहिणी येतात म्हणून त्यांना ज्येष्ठ आणि कनिष्ठा गौरी म्हणतात गौरींना माहेरचे सुख मिळावे म्हणून गौरी पूजनाच्या निमित्ताने तिचाही थाटमाट आनंदात केला जातो. मात्र फार काळ ती मुक्काम न करता सप्तमीला येते अष्टमीला जेवण होते आणि नवमीला तृप्त होऊन आशीर्वाद घेऊन स्वगृही जाते.
यंदा दुपारनंतर विधिवत पूजन करून घरोघरी गौराई विराजमान झाल्या.आकर्षक सजावटीमुळे देवीचे मनमोहक रूप लक्षवेधी ठरत आहेत. गौरींना सुंदर भरजरी साड्यांनी व दागिन्यांनी साज शृंगार केले होते. घरोघरी सुंदर आरास करण्यात आल्या असून गौरी समोर फळांचे व फराळाचे विविध पदार्थ ठेवण्यात आले होते. यावेळी शक्तीचे प्रतीक म्हणून पूजन केल्या जाणाऱ्या या गौरीकडे सर्वजण मनोभावे प्रार्थना करतात.
पहिला दिवस गौराई आगमनाचा असतो तर दुसऱ्या दिवशी त्यांना विविध पक्वानांचा नैवेद्य दाखवून पाहुणचार केला जातो. त्यानंतर तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन करून हा तीन दिवसांचा सण साजरा केला जातो.