प्रतिनिधी : – आशोक आव्हाळे
मांजरी ता.२२: संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान कार्यक्रमांतर्गत स्वच्छ ग्राम स्पर्धा सन २०२३-२०२४ वर्षाच्या कालावधी करीता घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये मांजरी खुर्द (ता. हवेली ) ग्रामपंचायतला ” जिल्हास्तरीय व्दितीय क्रमांक” प्राप्त झाला आहे. जिल्ह्यातील १४०० ग्रामपंचायत मध्ये मांजरी खुर्दने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. या कार्यक्रमाचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार ता.२१ रोजी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हे महाराष्ट्र शासनाने ग्रामीण भागातील स्वच्छतेसाठी सुरू केलेले एक महत्वाचे अभियान आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील लोकांमध्ये स्वच्छतेची जाणीव जागृत करणे आणि त्याद्वारे आरोग्य सुधारणे हा आहे.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते चार लाख रुपयांचे पारितोषिक, प्रशस्तिपत्र, स्मृती चिन्ह देऊन मांजरी खुर्द ग्रामपंचायतचा सन्मान करण्यात आला. गोरे यांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी मयूर उगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे, माजी सरपंच रुपेश उंद्रे, उपसरपंच मनिषा ढेरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सागर उंद्रे, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष रमेश उंद्रे, योगिता पवार, विठ्ठल सावंत, आश्विनी माळी उपस्थित होते.
जिल्हा परिषद पुणे, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) यांच्या वतीने घेण्यात आलेल्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान कार्यक्रमांतर्गत सन २०२३-२०२४ अंतर्गत जिल्हा स्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा व विशेष पुरस्कार वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
हे अभियान केवळ स्वच्छता मोहिम नसून, लोकांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना वाढवण्याचे एक महत्वाचे साधन आहे. गाडगेबाबांच्या विचारांवर आधारित हे अभियान, महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी एक महत्वाचा घटक असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे यांनी सांगितले. ग्रामस्थांनी केलेल्या सहकार्यामुळे आमच्या गावाला जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असल्याची भावना माजी सरपंच रुपेश उंद्रे यांनी व्यक्त केली.