प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
वाघोली ता.२८: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच शिरूर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर-हवेली मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची मुलाखत व महत्त्वपूर्ण बैठक आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या नेतृत्वाखाली श्रेयस बँक्वेट हॉल, वाघोली येथे संपन्न झाली.
या बैठकीस म्हाडा पुणेचे अध्यक्ष शिवाजीराव दादा आढळराव पाटील,आमदार ज्ञानेश्वर आबा कटके,महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सुरेश आण्णा घुले, जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा गारटकर, हवेली तालुका अध्यक्ष दिलीप नाना वाल्हेकर तसेच शिरूर तालुका अध्यक्ष रवींद्र बापू काळे, जिल्हा युवती अध्यक्षा पायल देवकर आदींसह विविध विभागीय सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ९ जिल्हा परिषद गट व १८ पंचायत समिती गणासाठी १०० पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या. या दरम्यान इतर पक्षातील उमेदवारांनी मुलाखती दिल्या. ही निवडणूक लढण्यास तरूण युवक व महिला कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले. अनेक इच्छुक महिलांच्या मुलाखती त्यांच्या पती राजाने व घरातील सदस्यांनी दिल्या.
या बैठकीदरम्यान आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी, मतदारसंघातील स्थानिक प्रश्न, कार्यकर्त्यांचे संघटन बळकट करण्याच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच कार्यकर्त्यांनी एकजुटीने व समन्वयातून पक्ष बळकटीसाठी योगदान द्यावे, असे आवाहनही आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी केले.
