प्रतिनिधी :- निलेश जगताप
शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व आठवी, एन एम एम एस परीक्षा, नवोदय परीक्षा, पुणे जिल्हा परिषदेने आयोजित केलेल्या इस्रो नासा परीक्षेतील निवड झालेले विद्यार्थी वरील सर्व गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे वर्गशिक्षक व मुख्याध्यापक यांचा यथोचित सन्मान शिक्रापूर ग्रामपंचायत दरवर्षी करत असते. यावर्षी देखील वरील प्रकारच्या एकूण 226 विद्यार्थ्यांचा व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या चाळीस वर्ग शिक्षक व मुख्याध्यापकांचा सन्मान ग्रामपंचायत मार्फत करण्यात आला. यशस्वी विद्यार्थ्यांना ट्रॉफी व एक प्रेरणादायी पुस्तक देऊन त्या सर्वांचा सरपंच उपसरपंच व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला.
या सन्मान सोहळ्याच्या निमित्ताने शिक्रापूर ग्रामपंचायत मार्फत शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक व माजी सनदी अधिकारी व महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते माननीय श्री इंद्रजीत देशमुख यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानाचा सर्व विद्यार्थी शिक्षक व पालक यांनी लाभ घेतला. या व्याख्यानामध्ये मार्गदर्शन करत असताना माननीय देशमुख यांनी सुजाण पालकत्व कसे असावे? याचे महत्त्व विशद केले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये बालवयातच बालसंस्कार कसे रुजवावे हे समजावून सांगितले.मुलांच्या जीवनामध्ये मैदानी खेळांचे महत्त्व हे त्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे हे सांगितले. त्याचबरोबर पालकांनी मुलांच्या अंगचे मूलभूत गुण व त्यांच्या मधील असणारी आवड ओळखून त्यांचे करिअर निवडावे असा सल्ला दिला. विद्यार्थ्यांनी देखील ज्या क्षेत्रात जायचे असेल ते क्षेत्र लवकर निवडावे म्हणजे ध्येय गाठणे सोपे होईल. विद्यार्थ्यांनी आपणास सामान्य राहायचे की असामान्य व्हायचे याचा विचार करून जीवनाची वाटचाल करावी असा मोलाचा संदेश माननीय देशमुख यांनी दिला. तसेच समाजाने पुढील पिढीला जगण्यासाठी लायक वातावरण निर्माण करावे असे सांगितले.
या कार्यक्रमासाठी उपस्थितामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद सदस्य सौ.कुसुमताई मांढरे सरपंच रमेश गडदे उपसरपंच सौ वंदनाताई भुजबळ गटविस्तार अधिकारी देंडगे साहेब केंद्र प्रमुख प्रकाश लंघे सर अनिल पलांडे सर सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामविकास अधिकारी नंदकुमार वैद्य समता परिषदेचे संघटक सोमनाथ भुजबळ, राजाभाऊ मांढरे, नवनाथ सासवडे, कैलासराव सोनवणे,पत्रकार बांधव राजाराम गायकवाड, विजय ढमढेरे तसेच सर्व पालक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष विधाटे सर यांनी केले व शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच रमेश गडदे आभार व्यक्त केले.