प्रतिनिधी-अशोक आव्हाळे
अनधिकृत होर्डिंग व अतिक्रमणावर PMRDA करणार कठोर कारवाई
सुरक्षित गाव, शहरासाठी निर्णायक पाऊले
पुणे दि.२२: सुरक्षित गाव, शहरासाठी पी एम आर डी ए ने निर्णायक पाऊले उचलली आहेत. पावसाळा आणि आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनधिकृत व धोकादायक होर्डिंगसंदर्भात पी एम आर डी ए ने निर्णायक भूमिका घेतली आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे (IAS) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या विशेष आढावा बैठकीत या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
या बैठकीत अनधिकृत होर्डिंग काढण्यास तातडीने सुरुवात करण्याचे आदेश देण्यात आले असून, या मोहिमेस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे. सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने धोका ठरू शकणाऱ्या सर्व होर्डिंग्ज हटविण्यासाठी पी एम आर डी ए सज्ज झाली आहे.
प्रमुख निर्णय पुढीलप्रमाणे –
▪️ होर्डिंग निर्मूलनात अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार
▪️ अनधिकृत जाहिरात लावणाऱ्या एजन्सी व जागामालकांवर कारवाईचा बडगा
▪️ नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह मोकळा करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना
▪️ अतिक्रमण करणारे व सार्वजनिक ठिकाणी राडारोडा टाकणाऱ्या बिल्डरांवर कठोर कारवाई
पी एम आर डी ए ने स्पष्ट केले आहे की, सुरक्षित, स्वच्छ व नियमबद्ध शहरासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. यासंदर्भातील सर्व कारवाई जलदगतीने पार पाडली जाणार असून, नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
“शहर सुरक्षित आणि अतिक्रमणमुक्त करणे ही पी एम आर डी ए ची प्राथमिकता आहे,” असे आयुक्त डॉ. म्हसे यांनी यावेळी स्पष्ट केले.
शासनाच्या निर्देशानुसार पी एम आर डी ने घेतलेली ही भूमिका शहरातील अनधिकृततेला आळा घालण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.