स्थानिकांचा व निष्ठावंतांचा विरोध..
प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
पुणे ता.६ : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पक्षाचे एकमेव आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला गेल्या काही दिवसांपासून चांगलंच उधाण आलं आहे. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश होत असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत बोलताना सुरेंद्र पठारेंनी स्वत: भाजपमध्ये जाणार ही अफवा असल्याचं सांगितलं होतं. मात्र आता पुन्हा एकदा या चर्चेला जोर आला आहे. यावरुन भाजपचे निष्ठावंत पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
‘वारे बदलले की पक्ष बदलणाऱ्यांना संधी मिळते, पण वर्षानुवर्षे काम करणाऱ्यांचं काय?’ असा सवाल स्थानिक नेते विचारत आहेत. अनेक इच्छुक उमेदवार आणि पदाधिकारी वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेऊन आपली भूमिका मांडत आहेत. अलीकडेच वडगाव शेरीतील शिष्टमंडळाने शहराध्यक्षांची भेट घेत, ‘बाहेरील लोकांना घेऊ नका; स्थानिक निष्ठावंतांना संधी द्या’, अशी मागणी केली.
‘आम्ही अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करत आहोत. बाहेरील लोकांना घेतल्यास आमचं मनोबल खचेल. पक्षाने भूमिका स्पष्ट करून निष्ठावंतांना विश्वास द्यावा’, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून शहराध्यक्ष आणि मंडळ अध्यक्षांकडे लेखी स्वरूपात करण्यात आली आहे. आता सुरेंद्र पठारेंचा पक्षप्रवेश झाला तर पुणे भाजपची राजकीय समीकरणं बदलणार हे नक्की. त्यामुळे आता सुरेंद्र पठारेंचा पक्षप्रवेश होणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
