मांजरीत रस्ता सुरक्षा अभियानात विद्यार्थ्यांना व पालकांना केले मार्गदर्शन
प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.८: वाहतूक शाखेद्वारे सुरू असलेल्या वाहतूक सुरक्षा अभियानानिमित्त वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोळींबकर यांनी आण्णासाहेब मगर विद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पोलीस उपायुक्त कार्यालय वाहतूक शाखा ,पुणे शहर (RSP) व वाघोली पोलीस ठाणे, पुणे शहर यांचे संयुक्त विद्यमाने वाहतूक नियमांची जनजागृती व सध्या घडत असलेल्या अल्पवयीन मुले व मुली यांच्या मनावर सध्या घडत असलेला परिणाम व या परिणामांचा समाजातील मुलांची गुन्हेगारीकडे चाललेली वाटचाल, सायबर क्राईमचे गुन्हे तसेच लहान मुले हे पालकांची वाहने घेऊन जातात व अपघात होतात व त्याचे कुटुंबावर होणारे परिणाम, तसेच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या सध्या वाढत असून अपघात कमी होऊन रस्ता सुरक्षा याबाबत समाजामध्ये तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून ग्रामपंचायत कार्यालय मांजरी खुर्द (ता. हवेली ) या ठिकाणी शनिवार (दि.८) रोजी “विद्यार्थी व पालक जनजागृती अभियान” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
वहातुक सुरक्षा अभियानानिमित्त वाहीद पठाण पो.नि. क्राईम ब्रांच युनिट ६,वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोळींबकर, पोलीस निरीक्षक सुवर्णा इंगळे यांनी विद्यालयातील विद्यार्थ्यी व पालकांना पोलीस पाटील भारती उंद्रे,माजी सरपंच विकास उंद्रे,दिपक उंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्ता सुरक्षासंदर्भात महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. यादरम्यान अनिरुद्ध जायभाये (ASI), सोन्याबापू सोंडकर (ASI), पोलीस हवालदार बाबु गदादे, हनिफ शेख, नितिन केंद्रे, हरिंदर सिंग,मुख्याध्यापक ठाकरे जे एल, सोनकांबळे सर, विठ्ठल ढमे, शिक्षकवृंद, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.
यामध्ये सिट बेल्टचा वापर सक्तीचा,गाडी ओव्हर टेक करताना पुढे लक्ष देऊन ओव्हर टेक करावे, हेल्मेट सक्ती, वाहन चालकाची कर्तव्य,कागदपत्रे जवळ बाळगणे, हॉर्न वाजवण्याचे परिणाम, अपघात तीन प्रकारचे असतात, अपघात कसे टाळायचे, रॅश ड्रायव्हिंग,आदी विषयांवर अनिरुद्ध जायभाये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सोशल मिडिया मध्ये बारा प्रकारे माहिती चोरली जाते तसेच सायबर गुन्हे कसे टाळायचे याची माहिती सतिश बिराजदार यांनी दिली. महिला सुरक्षा संदर्भात ११२ नंबरवर घटना स्थळाची माहिती कळवा त्वरित तेथे दामिनी पथक अथवा पोलीस हजर होतील.अनोळखी व्यक्तीशी बोलताना लांबुन बोला वैयक्तिक माहिती कोणाला देऊ नका असे आवाहन पोलीस निरीक्षक सुवर्णा इंगळे यांनी केले.
या अभियानात वाहन चालकांनी वाहन चालविताना मोबाइल फोनचा वापर करू नये, सिग्नलवर वेळेचे पालन करावे, मद्यपान करून वाहन चालवू नये, वाहन चालविताना वाहतूक नियमांचे पालन करा, आपल्यासमोर एखादा अपघात झाल्यास टोल फ्री अॅम्ब्युलन्सचा वापर करावा, जखमी व्यक्तीला लवकरात लवकर दवाखान्यात न्यावे, घडलेल्या घटनेविषयी पोलीस कोणतेही प्रश्न विचारणार नाही, अशी ग्वाही वाहीद पठाण यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली.
दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघाताच्या घटना कमी करणे, वाहतूक नियम , हेल्मेट सक्ती प्रबोधन, रस्ता सुरक्षा उपाय आणि वाहतूक नियमांबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हा कार्यक्रमाचा उद्देश ठेवून या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे पोलीस पाटील भारती उंद्रे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रिडा शिक्षक अनिल चंद तर आभारप्रदर्शन पोलीस पाटील भारती उंद्रे यांनी केले.
