प्रतिनिधी:- अशोक आव्हाळे
मांजरी दि.२२: लोहगाव येथील उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यासंदर्भात गुरुवार (दि.२२) रोजी महत्त्वपूर्ण बैठक आमदार बापूसाहेब पठारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत रुग्णालय कार्यान्वित होण्यासाठी ज्या काही अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे, त्याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. उर्वरित बांधकाम, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, विद्युत जोडणी अशा काही मूलभूत सुविधा अद्याप अपूर्ण असून यासंदर्भात संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या स्पष्ट सूचना पठारे यांनी यावेळी दिल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून हे रुग्णालय सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहे. नागरिक बांधवांची ही प्रतिक्षा आता संपायला हवी. सदर उपजिल्हा रुग्णालय सुरू झाल्यास लोहगाव तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिक बांधवांना आरोग्यसेवा सहज उपलब्ध होईल. शिवाय, ससून रुग्णालयावरचा भार कमी होईल व सार्वजनिक आरोग्यव्यवस्था अधिक सक्षम व बळकट होईल. या रुग्णालयाच्या संदर्भात मी अर्थसंकल्पीय अधिवेशनातही प्रश्न उपस्थित केला होता. नागरिक बांधवांना चांगल्या आरोग्यसेवेसाठी ‘लोहगाव उपजिल्हा रुग्णालय’ लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून विविध माध्यमातून, विविध पातळ्यांवर प्रयत्नशील राहणार असल्याचे पठारे यांनी सांगितले.
याप्रसंगी, डॉ. राधाकृष्ण पवार (मा. उपसंचालक, आरोग्य सेवा पुणे मंडळ पुणे), डॉ. एम. पल्ली (जिल्हा शल्यचिकित्सक, पुणे), श्रीमती भंडारे (कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (दक्षिण) विभाग, पुणे), अजय पाटील (उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग), घाटकर (शाखा अभियंता, पाणीपुरवठा विभाग) तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.