एक वैचारिक दृष्टिकोन
प्रतिनिधी :- नूतन पाटोळे
ऐतिहासिकदृष्ट्या विचार करता, योगविद्या कधी, कशी आणि कुठे अस्तित्वात आली, हे सांगणे अत्यंत कठीण आहे. प्राचीन ग्रंथांवर दृष्टिक्षेप टाकला, तर वेदांमध्ये आणि जैन धर्मीयांच्या ग्रंथांमध्ये योगविद्येचा उल्लेख सापडतो. त्यामुळे, योगविद्येची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे, असे आपण म्हणू शकतो. ज्या वेळी योगाशी संबंधित ज्ञान लिखित स्वरूपात तयार झाले नव्हते आणि मौखिक पद्धतीने गुरू-शिष्य परंपरेद्वारे शिकवले जात होते, त्या काळापासून योगविद्येचा उपयोग केला जात आहे. मात्र, योगाचा जन्म नेमका कधी झाला आणि योगविद्येचा जनक कोण या वादविवादात अडकणे फारसे महत्त्वाचे नाही; तर योगसाधनेची रहस्ये कधी आणि कोणी उकलून समोर आणली, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. हजारो वर्षांपासून योगाने जगावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. योगाने जगातील सर्व धर्मांना प्रमाणित केले आहे, मान्यता दिली आहे आणि मानवजातीला योग्य दिशेने पुढे नेले आहे.
