प्रतिनिधी नूतन पाटोळे
कुठलेही काम लगेच किंवा झटपट होत नाही, ही गोष्ट आपण पूर्णपणे लक्षात ठेवलीच पाहिजे. त्यासाठी अभ्यासाची आणि सरावाची गरज असते. मग ते योगासन असो वा व्यायाम ! सकाळी शरीर कडक, काहीसे आखडल्यासारखे असते. त्यामुळे आसनांचा सराव किंवा अभ्यास सहजगत्या होऊ शकत नाही. म्हणून शरीर मोकळे (लवचीक) करण्यासाठी आणि योगासनाची तयारी करण्यासाठी काही सूक्ष्म व्यायाम करण्याची गरज असते. त्यामुळे आसनांचा अभ्यास करण्यात सुलभता येते आणि कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तसे पाहता योगाचार्यांच्या मते, सूक्ष्म व्यायामामुळे सूक्ष्म प्राणाचा नियमित विकास होतो आणि त्यांच्या नावानुसार ते शरीराला संतुलितही ठेवतात.जवळजवळ ही सगळी आसने गतिमान वायुनिरोधक (पवनमुक्तासन) आणि शक्तिबंध-समूहाच्या आसनांतर्गत येत असल्यामुळे यांची वेगळी व्याख्या न देता त्या सर्वांना सूक्ष्म व्यायामातच समाविष्ट केले आहे. साधकांनी यांचा उपयोग करून क्रमाक्रमाने त्यांचा लाभ घ्यावा. (लेखकाने कित्येक ठिकाणी योगकेंद्रांमध्ये जाऊन पाहिले आहे की, काही ठिकाणी यांना ‘पवनमुक्तासन समूह’ म्हणतात; तर काही ठिकाणी त्यांना ‘सूक्ष्म व्यायाम’ म्हणतात.)योगाचार्य गुरुदेव फूलचंद योगीराज यांनी त्यांचे गुरू स्वामी धीरेंद्र ब्रह्मचारी यांच्याकडून योगाचे सूक्ष्म व्यायाम शिकून घेतले आणि नंतर त्यांनी मला ते शिकवले. गुरुदेवांचे असे म्हणणे आहे की, स्वामी धीरेंद्र ब्रह्मचारी नेहमीच असे म्हणत असत की, हे सूक्ष्म व्यायाम अनेकानेक लोकांपर्यंत पोहोचले पाहिजेत आणि सर्वांना त्यांचा लाभ मिळाला पाहिजे. मी गुरुदेवांचे, स्वामी कार्तिकेयर्जीचे आणि स्वामी धीरेंद्र ब्रह्मचारी यांचे आभार मानतो.
