प्रतिनिधी : -आशोक आव्हाळे
मांजरी ता.२८: कोलवडी (ता.हवेली) येथे लक्ष्मी गार्डन मंगल कार्यालयात रविवार (ता.२८) रोजी थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली अभूतपूर्व गोंधळात संपन्न झाली. काही सभासद आपले विषय मांडत असताना गोंधळ निर्माण झाला. कारखान्याचा वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा तोटा पत्रकांसह सहा विषय संचालक मंडळाने अभूतपूर्व गोंधळात आवाजी मतदानाने मंजूर करून घेतले.
मागील काही दिवसांपासून यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या जमीन विक्री संदर्भात शासनाकडून मिळालेल्या आदेशानंतर या जमीनीचा व्यवहार कृषी उत्पन्न बाजार समिती बरोबर २९९ कोटी रुपयांना ठरल्या नंतर ही जागा बाजार समिती घेणार आहे. या व्यवहारानंतर आलेल्या रक्कमेतुन शेतकऱ्यांची, कामगारांची व इतर देणी देऊन कारखाना चालू करण्याचे संचालकांच्या मिटींग मध्ये ठरले. यासंदर्भात माहिती मिळाल्यानंतर शासनाने घालून दिलेल्या अटी शर्तींचा विचार करता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या काही संचालकांनी याकडे निर्देश करत सर्व अटी शर्तींच्या धरतीवर ही जमीन विक्री प्रक्रिया पार पाडावी व भविष्यात उद्भवणाऱ्या अडचणी या स्पष्ट केल्या होत्या, त्यामुळे या सर्वसाधारण सभेकडे यशवंतच्या सभासदांचे लक्ष लागले होते.
या सभेची सुरुवात या सभेचे अध्यक्ष यशवंत सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सुभाष जगताप यांच्या मनोगताने झाली. सुभाष जगताप यांनी गेली १३ ते १४ वर्ष घडलेल्या सर्व घडामोडींचा आढावा या बैठकीत मांडला. यादरम्यान ज्यांनी ज्यांनी कारखान्याच्या हिताच्या दृष्टीने सहकार्य केले त्यांचे आभार मानले. विशेषतः कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग काळे व त्यांचे सहकारी यांनी न्यायालयीन लढा लढल्यानंतरच हे संचालक मंडळ आज कार्यरत आहे असे त्यांनी सांगितले. कारखान्याच्या सभासदांच्या हिताचा विचार करत यशवंतला पुन्हा गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी सर्व संचालक मंडळाने गेल्या काही महिन्यांमध्ये मोठा प्रयत्न करून शासन दरबारी आपल्या भूमिका मांडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार,एकनाथ शिंदे, माजी कृषिमंत्री शरद पवार व आमदार यांच्याशी संवाद साधून या निर्णयापर्यंत आपणास येता आले हे त्यांनी सांगितले. जगताप यांनी आपल्या भाषणात सांगितले की संचालक मंडळाने कारखान्याच्या खर्चातील जवळपास १०५ कोटी रुपये वाचवले असून ज्या बँकांची देणी आहेत त्यांना वन टाइम सेटलमेंट नुसार पैसे देण्यात आलेले आहेत. त्यामुळे कारखान्याची सर्व जमीन आता मोकळी झाल्याचे त्यांनी सांगितले. ओ टी एस मध्ये सर्व बँकांची देणी दिली आहे. अध्यक्षांच्या मनोगतनंतर कारखान्याचे कार्यकारी संचालक कैलास जरे यांनी विषय पत्रिकेचे वाचन करून त्यांनी एक एक विषय वाचून दाखवले आणि सभासदांकडे मंजुरीसाठी मांडले. यावर या सभेतील विषयाव्यतिरिक्त काही माजी संचालकांनी कारखान्याच्या मालकीची ९९.२७ एकर जमीन विक्रीचा विषय छेडला. तर विकास लवांडे यांनी सभेच्या कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला. यावेळी बोलताना विशाल हरपळे म्हणाले की,आम्ही कोणाला घाबरत नाही ,प्रत्येक जण या ठिकाणी शेतकरी आहेत त्यांना बोलण्याचा अधिकार आहे. मला दहा मिनिटे शेतकऱ्यांच्या हितासाठी बोलायचे, आपल्याला कारखाना सुरू होण्याच्या उद्देशाने भांडायचे असुन कारखान्याच्या कामगारांची सभासदांची देणी कधी मिळणार? याबाबत विषय मांडा पण सभा मोडीत काढण्यासाठी कुणीही प्रयत्न करू नका. जर सभा मोडीत काढली तर शेतकरी सभासद व कर्मचाऱ्यांना मोठा फटका बसेल असे सांगितले. दरम्यान सभेत गोंधळाचे वातावरण सुरू झाल्याने कारखान्याचे कार्यकारी संचालक कैलास जरे यांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषय वाचून उपस्थितांना ठराव मंजूर आहेत का अशी विचारणा केली. यावर उपस्थित सभासदांनी सहाही ठराव मंजूर अशा घोषणा देत हात वर करून सर्व विषय मंजूर असल्याचे सांगितले. या गोंधळात संचालक मंडळाने सभा आटोपती घेतली व राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश जगताप, उपसभापती शशिकांत गायकवाड, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, राजेंद्र खांदवे, रोहिदास उंद्रे, कामगार संघटनेचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, कारखान्याचे उपाध्यक्ष किशोर उंद्रे, संचालक सुनील कांचन, संतोष कांचन, राहुल घुले, योगेश काळभोर, सुशांत दरेकर,विजय चौधरी, शशिकांत चौधरी, ताराचंद कोलते, नवनाथ काकडे, सागर काळभोर, रामदास गायकवाड, शामराव कोतवाल,प्रताप गायकवाड,रमेश गोते, हेमलता काळभोर, रत्नाबाई काळभोर, दिलीप शिंदे, मोहन म्हेत्रे, कुंडलिक थोरात यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या दरम्यान लोणीकंद पोलीसांच्या वतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.चौकट: थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याचे नामकरण करून ” श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखाना ” असे करण्यात आल्याचे अध्यक्ष सुभाष जगताप यांनी जाहीर केले. याचे सभासदांनी टाळ्या वाजवून स्वागत केले. या नामकरणाला शासन मान्यता मिळाली असल्याचेही त्यांनी सांगितले.