प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.२७: मांजरी खुर्द (ता. हवेली ) येथील मार्तंड वि.का.सेवा सहकारी संस्थेला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने सन २०२४-२५ चा हवेली तालुक्यातील “उत्कृष्ट विकास सोसायटी पुरस्कार” नामदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व नामदार दिलीप वळसे पाटील, बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत ढाल देऊन गौरविण्यात आले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित(पीडीसीसी) ची १०८ वी अधिमंडळाची वार्षिक सभा अल्पबचत भवन, पुणे येथे पार पडली. यावेळी पुणे जिल्ह्यातील विविध सहकारी संस्थांनी केलेल्या नेत्रदीपक कार्याचा गौरव या सभेत करण्यात आला. या संस्थांना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, नामदार दत्तात्रय भरणे आणि नामदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते ढाल आणि धनादेश देऊन गौरविण्यात आले.
या सोसायटीने चालू आर्थिक वर्षात कर्जवाटप,वसूली, सर्व क्षेत्रात “अ वर्ग” दर्जाच काम केले. संस्थेच्या यशाचा आलेख जसा गेल्या २८ वर्षात उंचावत गेला तो येत्या काळात ही अधिक उंचावर जाऊन सहकारी संस्था हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे तो अधिक बळकट करून शेतकरी सभासदांच जीवनमान समृद्ध करण्यासाठी संस्था सतत प्रयत्नशील राहिल असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे यांनी सांगितले. यावेळी मार्तंड सेवा सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळ उपस्थित होते.