प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे
मांजरी दि.२४ : मांजरी खुर्द येथे मांजरी वाघोली रोड तसेच मांजरी कोलवडी रोड व कोलवडी केसनंद रोड या ग्रामपंचायत हद्दीतील ग्रामीण भागात रस्त्यालगत बेकायदा व धोकादायक होर्डिंगचे जीव घेणे जाळे पसरल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.पाऊस व वादळामध्ये विनापरवाना धोकादायक होर्डिंग मुळे नागरिकांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. या बाबींना पायबंध घालण्याऐवजी पीएमआरडीए प्रशासन त्यास पाठबळ देत आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जातो. मांजरी खुर्द व इतर ग्रामपंचायत हद्दीत असणाऱ्या अनेक होर्डिंग साठी स्थानिक ग्रामपंचायतीची परवानगी घेतली गेली नसल्याची माहिती पुढे आली आहे. या होर्डिंग मुळे जीवाला धोका निर्माण झाल्याने नागरिकांकडून संबंधितांवर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.
ग्रामीण भागात गावातील रस्ते व आवारातील होर्डिंगची आकडेवारी ही पीएमआरडीकडे किंवा ग्रामपंचायत विभागाकडे उपलब्ध नाही का ? तसेच अनेक होर्डिंग्ज हे खाजगी व सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आले आहेत.सध्याच्या काळात या बेकायदा व धोकादायक होर्डिंगची लाखो रुपयांची उलाढाल होताना दिसत आहे. या होर्डिंगला मनमानी भाडे आकारले जाते. आता उन्हाळा संपत असताना वादळी वारे अवकाळी पाऊस चांगला पडत आहे. होर्डिंग कोसळून मोठी जीवित हानी होण्याची दाट शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी पुणे व परिसरात होर्डिंग कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.भुकूम ता. मुळशी येथे भले मोठे होर्डिंग कोसळून वित्तहानी झाली. त्याचप्रमाणे सणसवाडी तालुका शिरूर या ठिकाणी मोठे होर्डिंग कोसळून अनेक दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या दोन्ही ठिकाणी कुठलीही जीवित हानी झाली नाही. हे होर्डिंग्ज नेमकं रस्त्यावर पडले या दरम्यान पाऊस असल्याने प्रवाशी वाहतूक बंद होती.
या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून खबरदारी घेणे गरजेचे आहे. या मोठमोठ्या होर्डिंग मुळे मोठा धोका संभवतो.
तसेच अनेक ठिकाणी महावितरणच्या व ग्रामपंचायतच्या विजेच्या खांबावरती प्लॉटिंग धारकांनी व इतर व्यवसायिकांनी आपली जाहिरात करण्यासाठी त्या खांबांचा वापर केल्याचे दिसून येते. आपल्या जाहिरातीसाठी फुकटचे खांब वापरायला मिळत असल्याने याला कुठलाही खर्च येत नाही परंतु वादळामध्ये या फ्लेक्स मुळे या खांबांना धोका होऊ शकतो. यासाठी पीएमआरडीए,ग्रामपंचायत विभाग व महावितरण कंपनी काय कार्यवाही करणार का? असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
“सध्या मांजरी खुर्द येथील कुठल्याही होर्डिंगला परवानगी दिली नसून त्यामधून कुठलाही कर या होर्डिंग धारकांकडून घेत नसल्याचे ” मांजरी खुर्दचे ग्रामसेवक मयुर उगले यांनी सांगितले.