प्रतिनिधी :- अशोक अवहाळे
मांजरी ता.१६: मांजरी खुर्द (ता.हवेली) येथे आरोग्य दुत युवराज काकडे व पल्लवी युवराज काकडे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान महाआरोग्य शिबिरास येथील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरामध्ये तब्बल ११४५ हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला.
शिबिरात हृदय तपासणी,सर्वसाधारण आरोग्य तपासणी, दंत तपासणी, हाडांची तपासणी, स्त्री रोग तपासणी, हिमोग्लोबिन, शुगर, रक्तदाब तसेच कान नाक घसा तपासणी अशा विविध तपासण्यांचा यामध्ये समावेश होता. याशिवाय हात व पायांच्या मोफत कृत्रिम अवयवांसाठी नोंदणी देखील करण्यात आली असल्याचे आरोग्य दूत युवराज काकडे यांनी सांगितले.
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे हीच खरी जनसेवा आहे. गेल्या दहा वर्षापासून मी असे महाआरोग्य शिबिर आयोजित करत आलो आहे. यामध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अखंडितपणे मिळत असुन नागरिक या शिबिराची आवर्जून वाट पाहत असतात अनेकांना कृत्रिम हात पाय व विविध प्रकारच्या सर्जरी मोफत करून दिल्या असल्याचे आरोग्य दूत युवराज काकडे यांनी सांगितले.
दरम्यान ७२० नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ६४० नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच ५१ रुग्णांमध्ये मोतीबिंदू, ७ रुग्णांना कान व नाकाचे ऑपरेशन, तर १ रुग्णाला गुडघ्याच्या शस्त्रक्रियेचे निदान झाले असून, या सर्वांवर आगामी काही दिवसांत मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. याशिवाय ४ नागरिकांना कृत्रिम हात व पाय देण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यदूत काकडे यांनी दिली.
यावेळी बोलताना युवराज काकडे म्हणाले की, लोकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणे. वेळेवर आजार ओळखण्यासाठी मोफत आरोग्य तपासणी करणे. वंचित आणि गरजूंना वैद्यकीय सेवा पुरवणे.
डॉक्टर आणि तज्ञांकडून आवश्यक सल्ला आणि उपचार देणे. हे आरोग्य शिबिराचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
या महाआरोग्य शिबिरामुळे परिसरातील अनेक नागरिकांना महत्त्वाच्या तपासण्या, निदान व उपचार विनामूल्य उपलब्ध झाले असून, या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे. अशा महाआरोग्य शिबिरांची शेजारील इतर गावांमध्येही मागणी होताना दिसते आहे.
