प्रतिनिधी : – आशोक आव्हाळे
ठेकेदाराचा हलगर्जीपणा, नागरिकांना होतोय त्रास
मांजरी ता.१५: मांजरी खुर्द येथे मांजरी कोलवडी रस्त्याच्या शेजारी रामदास बांगर यांच्या घराजवळ सुस्थितीत असणारा रस्ता फोडून पुन्हा एकदा त्या ठिकाणी नवीन सिमेंट काँक्रीटचा रस्ता बनविला आहे. या रस्त्यावर काम केल्यानंतर त्यावर वाफे करून पाणी साठवायला हवे होते परंतु तेही काम ठेकेदाराने केले नाही. परंतु या ठिकाणी रस्ता बनवत असताना येथील ड्रेनेज लाईनचे चेंबर निकृष्ट दर्जाचे बनवले असून या ड्रेनेज लाईन मध्ये काम करत असताना मोठ्या प्रमाणात राडाराडा पडल्याने ही ड्रेनेज लाईन चोकअप झाली असून येथील चेंबर मधून या ड्रेनेजचे पाणी पूर्णतः रस्त्यावर येत असल्याने येथील नागरिकांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. संबंधित ठेकेदाराला वारंवार फोन केला असता हा ते काम करून घेतो, कामगार पाठवतो अशी उडवा उडवी ची उत्तरे देत आहे. या कामाला जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. तक्रार करूनही याची कोणीही दखल घेत नाही असेही येथील नागरिकांनी सांगितले आहे. ग्रामपंचायतला सरपंच नसल्याने कुठल्याही कामाची माहिती नागरिकांना मिळत नाही, तसेच अनेक कामे प्रलंबित आहेत अशी तक्रार कल्पेश थोरात यांनी केली आहे. या कामाविषयी कोणीही माहिती देत नाही.
आमदार फंडातून हे काम झालेले आहे. आम्ही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. ग्रामपंचायत कडे हे काम कार्यान्वित नसल्याने ग्रामपंचायतला हे काम माहीत नाही. ठेकेदाराने परस्पर काम केले आहे अशी माहिती ग्राम विकास अधिकारी मयूर उगले यांनी दिली.