प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे
मांजरी ता.३१: मांजरी खुर्द- कोलवडी रस्त्यावर नुकत्याच झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहन चालकांना तसेच पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांना कसरत करावी लागत असुन याचा त्रास सहन करावा लागत आहे. हडपसरकडुन जवळचा मार्ग म्हणून असलेला अष्टविनायकांपैकी एक असलेल्या थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी या रस्त्यावर आहे. या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्याचा सामना पायी चालणाऱ्या नागरिकांना करावा लागत आहे. रस्त्यावरुन जाताना एखादे वाहन येथुन जाताना अंगावर पाणी उडते. यामुळे नागरिकांमध्ये वादविवाद होत असताना दिसतात.
अनेक दुचाकी वाहने घसरुन पडल्याने दुचाकी स्वार जखमी झालेले समजते. वाहन चालकांचे अक्षरशः कंबरड मोडले आहे. या खड्ड्यांमुळे अनेक वाहने खिळखिळी झाली आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाने व स्थानिक प्रशासनाने हे खड्डे लवकर बुजवून नागरिकांची गैरसोय दूर करावी अशी मागणी येथील अध्यात्मिक विकास परिषदेचे अध्यक्ष जगदीश महाराज उंद्रे, संजय उंद्रे, बापुसाहेब पवार, आप्पासाहेब मुरकुटे यांनी केली आहे.