लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश
प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.२२: मांजरी खुर्द येथे एका पिसाळलेल्या कुत्र्याने ८ ते १० जणांना चावा घेऊन जखमी केल्याची घटना गुरुवार (ता.२१) रोजी माळवाडी, गावठाण हद्दीतीत घडली आहे. परिसरातील नागरिकांनी जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती पोलीस पाटील भारती उंद्रे यांना नागरिकांनी दिल्यानंतर त्यांनी युनिव्हर्सल ऍनिमल लाईफ लाईन सेंटर,पुणे यांच्याशी संपर्क साधला असता श्री ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वीरेंद्र शिंदे आणि टीम या कुत्र्याला पकडण्यासाठी हजर झाली.
या परिसरातील नागरिक मुलं रस्त्याने ये जा करत होते . दरम्यान अचानक पिसाळलेला कुत्रा रस्त्यावरून फिरणाऱ्या नागरिकांना चावा घेत सुटला. यामध्ये लहान मुले,ज्येष्ठ नागरिकांना कुत्र्याने चावा घेत दहशत निर्माण केली. तब्बल १० जणांना चावा घेऊन जखमी केले. कुत्रा चावा घेत असल्याने नागरिकांना काही कळण्याच्या आतच तो दुसऱ्याला चावा घेऊन पळून जात होता. या पिसाळलेल्या कुत्र्याची परिसरात दहशत निर्माण झाली होती. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. साधे कुत्रे दिसले तरी नागरिक घाबरत होते व त्यापासून आपला बचाव करत होते.
पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलेले नागरिक पुणे येथील ससून रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल झाले होते. त्या ठिकाणी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आल्याची माहिती पोलीस पाटील भारती उंद्रे यांनी दिली.