प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.१०: बदलत्या हवामानामुळे मांजरी,कोलवडी परिसरातील ऊस पिकावर पांढरा लोकरी मावा व खोडकिड रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. खतांच्या वाढलेल्या किंमती आणि योग्य बाजारपेठ न मिळाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, पिकांचे मोठे नुकसान होत आहे.पिकांचे नुकसान आणि उत्पादन घटल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या कीड व्यवस्थापन कार्यक्रम, कृषी विषयक नियोजन व सल्ले यांच्या अभावामुळे परिसरातील शेतकऱ्यांना या रोगांवर वेळेवर आवश्यक ते उपाययोजना करता न आल्यामुळे त्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने कृषी विभागाने उसावरील पांढरा लोकरी मावा व खोड किडीवर त्वरित उपाययोजना करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी वर्गाकडून होत आहे. या रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाल्याने उसाचे पीक अगोदर पांढरे व नंतर पिवळे होते. परिसरातील ऊस या पिकावर हे प्रमाण अधिक प्रमाणात वाढत जाऊन पूर्ण शेतातील उसाचे उभे पीक पिवळे पडते. तसेच पावसाचे प्रमाण कमी असल्याने खोड किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या खोड किडीमुळे ऊसाचे बेट निकामी केले जाते. त्यामुळे परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झालेला दिसून येत आहे. या रोगामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपला कमी दिवसातला ऊस कुट्टीला देताना दिसत आहे. कुट्टीला बाजारभाव कमी मिळत असला तरी नाईलाजाने ऊस कुट्टीला द्यावा लागत असल्याचे शेतकरी आनंदा मुरकुटे,संजय भोसले, सतिश आव्हाळे, राजेंद्र उंद्रे, सुभाष लांडगे,संजय गायकवाड, तुकाराम पवळे यांनी सांगितले.
अनेक शेतकऱ्यांनी उसाची लागवड केलेली असून त्या उसावर लोकरी मावा,खोडकिड व पांढरी माशीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याने परिसरातील बरेचसे शेतकऱ्यांचे उसाचे पूर्ण शेत निकामी झाल्याचे दिसून येत आहे. तरीदेखील कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी या रोगांच्या बंदोबस्तासाठी अनेक उपाय करूनदेखील काहीही उपयोग झालेला नाही.
तसेच मागील वर्षीदेखील परिसरातील उसावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला होता. परिसरातील उसावर आगमन झालेल्या लोकरी मावा, खोडकिड व पांढरी माशीचा त्वरित बंदोबस्त करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.