प्रतिनिधी :- भगवान खुर्पे
तळेगाव ढमढेरे दि. २२ –
खेळ हा आपल्या सर्वांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय स्तरावरील क्रीडा विभाग अधिक सक्षम होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन इंदापूर तालुका ग्राम विकास प्रतिष्ठानचे सचिव विरसिंहभैय्या रणसिंग यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समिती आणि तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे साहेबराव शंकरराव ढमढेरे महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या प्रथम सभेचे उद्घाटन करताना ते बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे अध्यक्ष डॉ. अर्जुन मुसमाडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
शिक्षण प्रसारक मंडळ व पुण्याच्या विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेशबापू ढमढेरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. रमेश गायकवाड, विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागाचे संचालक डॉ. सुदाम शेळके, ओतूर येथील अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे, उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी आणि पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव प्रा. डॉ. अमेय काळे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
श्री. रणसिंग पुढे म्हणाले की, आजच्या आव्हानाच्या परिस्थितीमध्ये युवकांनी तंदुरुस्त असणे महत्त्वाचे आहे. खेळाकडे सर्वच घटकांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. बौद्धिक खेळासह मैदानी खेळ ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. विद्यापीठे आणि महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर क्रीडा उपक्रमांसाठी पोषक व अनुकूल वातावरण तयार करणे गरजेचे असल्याचेही श्री. रणसिंग म्हणाले.
महेशबापू ढमढेरे यांनीही याप्रसंगी आपली मनोगत व्यक्त केले. पूर्वजांनी घालून दिलेले आदर्श आणि संस्कार पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. ग्रामीण भागामध्ये शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या माध्यमातून तळेगाव ढमढेरे व पंचक्रोशी मध्ये आम्ही उत्तम आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना क्रीडा समितीचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन मुसमाडे यांनी विद्यापीठाने दिलेली जबाबदारी उत्तमपणे पार पाडू अशी ग्वाही दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्रीडा समितीचे यजमानपद भूषविताना आमचे महाविद्यालय कुठेही कमी पडणार नसल्याचेही ते म्हणाले. खेळ आणि खेळाडू वृत्तीला व विविध क्रीडा प्रकारांना चालना देऊन महाविद्यालयीन युवकांच्या अंगी सकारात्मक ऊर्जा तयार होण्यासाठी आपण सर्वजण प्रामाणिक प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. महाविद्यालयाच्या वतीने राबवल्या जात असलेल्या विविध योजना आणि उपक्रमांचा त्यांनी आढावा घेतला.
याप्रसंगी चाकण महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. शैलेंद्र कांबळे यांचा निवृत्ती निमित्ताने सन्मान करण्यात आला. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
तळेगाव ढमढेरे महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. प्रदीप राजधर पाटील, प्रा. डॉ. शांताराम साळवे आणि कै. हौसाबाई किसन लाहोटे आदींचे नुकतेच निधन झाले. या सर्वांना याप्रसंगी श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीच्या या प्रथम सभेस पुणे जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील ९५ प्राध्यापक सहभागी झाले होते.
पुणे जिल्हा विभागीय क्रीडा समितीचे सचिव व तळेगाव ढमढेरे महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ. अमेय काळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
प्रा. डॉ. संदीप सांगळे यांनी सूत्रसंचालन तर अर्थशास्त्र विभागाच्या प्रा. डॉ. प्रीती पवार यांनी आभार प्रदर्शन केले.