प्रतिनिधी :- अशोक अव्हाळे
पुणे ता.२२: महापालिकांच्या निवडणुकांसाठीची प्रारुप प्रभाग रचना अंतिम झाली असून राज्यभरातील तब्बल 29 महापालिकांची प्रारुप प्रभाग रचना तयार करून राज्य सरकारने ती राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. त्यामुळे आता ख-या अर्थानं राज्यात महापालिकांच्या निवडणुका होणार हे निश्चित आहे. परिणामी इच्छुकांना पायाला भिंगरी लावून निवडणुकीची तयारी करावी लागणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीची आरक्षणाची प्रक्रिया आणि प्रभाग रचनेचा तिढा सुटल्यानंतर राज्य सरकारने या निवडणुकींच्या तयारीला वेग घेतलाय. त्यातूनच महापालिका निवडणुकांची प्रारुप प्रभाग रचना तयार केली, ती अंतिम मंजुरीसाठी निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. त्यानंतर निवडणूक आयोग ती जाहीर करेल आणि त्यावर लोकांकडून हरकती सूचना मागवल्या जातील. आणि त्यानंतर हरकती सूचनांचा विचार करून अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल. अर्थात 25 ऑगस्टपर्यंत कोणत्याही क्षणी प्रारुप प्रभाग रचना जाहीर होईल. त्यानंतर सप्टेंबरमध्ये अंतिम प्रभाग रचनेवर शिक्कामोर्तब होईल.
प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्यापाठोपाठ प्रभागांमधील आरक्षणाची सोडत होऊन निवडणुकांचा बार उडेल. म्हणजे नव्या वर्षात राज्यातल्या 29 महापालिकांमध्ये नवे महापौर बसतील, अशी शक्यता आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मे 2021 पासून रखडल्या आहेत. सर्वो्च्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत चार आठवड्यात अधिसूचना काढा आणि चार महिन्यांच्या आत निवडणूक घ्या, असं न्यायालयाने म्हटलं होतं. त्यानुसार, राज्य सरकारच्या हालचालींना वेग आला असून राज्य सरकारकडून आता प्रारुप प्रभाग रचना निवडणुक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. आता पुढच्या काही दिवसांत म्हणजेच 23-25 ऑगस्टपर्यंत प्रारुप प्रभाग रचना निवडणूक आयोगाकडून जाहीर होऊ शकते.
प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर त्यानंतर साधारण 15 दिवस प्रभाग रचनेवर हरकती-सूचना घेतल्या जातील. त्यावर आयोगाकडे सुनावणी घेऊन आणि त्यानंतरच्या 10 दिवसांत अंतिम प्रभाग रचना जाहीर करतील. त्यात प्रभागांमधील आरक्षण सोडत होईल. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक जाहीर होईल. थोडक्यात 20 ते 25 डिसेंबरला मतदान आणि जानेवारी 2026 मध्ये नवे महापौर पदावर दिसतील, अशी शक्यता आहे.