प्रतिनिधी : – आशोक आव्हाळे
फुरसुंगी – श्री भेकराईमाता माध्यमिक विद्यालयात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे वैशिष्ट्य असलेल्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी वारकऱ्यांच्या वेषात, हाती वैष्णवांची पताका घेऊन सोहळ्यात सहभागी झाले. डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन विद्यार्थिनी उत्साहाने सहभागी होऊन, फुगडी खेळत सोहळ्यात रंगत आणत होत्या. कपाळी बुक्का आणि चंदनाचा टिळा, हातात टाळ, गळयात तुळशीच्या माळा, भक्तीरसात न्हालेले मन, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबांच्या नामांचा जयजयकार, विठू नामाचा अखंड जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर असे दृश्य विद्यार्थी आणि पालकांना याची देही याची डोळा विद्यालयात अनुभवता आले. पावसाच्या हजेरीने सोहळ्याची रंगत आणखीनच वाढवली. पालखी सोहळ्यातले एक महत्वाचे आकर्षण म्हणजे रिंगण.
पावसाची रिमझिम अंगावर घेत, विद्यार्थ्यांनी पालखी सोहळ्यातील रिंगण पूर्ण केले. पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन पर्यावरण दिंडी, साक्षरता दिंडी आणि व्यसनमुक्तीचे संदेश या सोहळ्याच्या निमित्ताने समाजापर्यंत पोहचवण्यात निसर्ग मंडळ आणि स्काऊट – गाईडचे विद्यार्थी यशस्वी झाले. मल्हार ग्रुपच्या वतीने विशाल कामठे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले. विद्यालयाची विद्यार्थिनी प्रवचणकार गौरी जाधव हिने सुंदर प्रवचन सादर केले. श्री शंभू महादेव देवस्थान ट्रस्ट, फुरसुंगीच्या पदाधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. सुनील कामठे, उपमुख्याध्यापक संपत मेमाणे, पर्यवेक्षक सुनील दीक्षित, एकनाथ देशमुख सर, सविता दुर्गे, प्रसन्न धर्माधिकारी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून सोहळ्यास सुरवात झाली. अपर्णा बिरदवडे, ज्योती जवळकर, नेहा पवार, रोहिणी जगताप, स्वप्नील गिरी, ज्ञानेश्वर कामठे, मंदा वाघमारे, नितीन बनसोडे, सांस्कृतिक विभाग आणि सर्व शिक्षक-शिक्षकेतर वृंद, सेवक यांनी पालखी सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केले. विद्यालयाच्या उपक्रमाचे पालकांनी कौतुक केले.