प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
पुणे ता.१० : समाजाला विचार करायला लावणारे, हृदयाला स्पर्श करणारे उपक्रम राबविण्याची परंपरा जपणाऱ्या अस्तित्व कला मंच तर्फे ‘अभंग तुकाराम’ या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो अत्यंत अनोख्या पद्धतीने आयोजित करण्यात आला.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे — भीमाशंकर परिसरातील आदिवासी व कातकरी समाजातील मुले, विठ्ठलराव शिवरकर विद्यालयातील विद्यार्थी, अनाथाश्रमातील लहानगे तसेच भजनी मंडळाचे सदस्य यांनी या चित्रपटाचा आनंद घेतला.
पहिल्यांदाच थिएटरमध्ये प्रवेश करताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले कौतुक, आनंद आणि भावनांचे मिश्र चित्रण सभागृहातील सर्वांच्या मनाला स्पर्शून गेले.
कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी चित्रपटाचे दिग्दर्शक दीपल लांजेकर, तुकारामांच्या भूमिकेतले योगेश सोमण, आवलीची भूमिका साकारलेली स्मिता शेवाळे, सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी तसेच कलाकार बिपिन सुर्वे हे सर्व कलाकार विशेषतः उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने कार्यक्रम अधिकच संस्मरणीय ठरला.
टाळ-मृदुंगांच्या नादात कलाकारांचे स्वागत करण्यात आले, आणि “ज्ञानोबा-तुकाराम” जयघोषाने संपूर्ण मल्टिप्लेक्स दुमदुमून गेला! कलाकारांसोबत खेळलेली फुगडी आणि मृणाल कुलकर्णींचा उत्स्फूर्त सहभाग या क्षणांनी वातावरण भक्तिभावाने भारावून गेले.
या उपक्रमासाठी साधू टिळेकर, दादा खेतमाळीस, अंजनाबाई कुदळे आणि गोसेवक निलेश पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन संस्थापिका डॉ. अश्विनी शेंडे, संस्थापिका श्रुतिका चौधरी, विश्वस्त दीपक कुदळे, सदस्य नीता तारू, आदेश तांबे, ज्ञानेश्वर जाधव आणि संस्थापक योगेश गोंधळे यांनी संयुक्तपणे केले. सुमारे ५०० उपस्थितांनी या चित्रपटाचा आध्यात्मिक आणि भावनिक अनुभव घेतला.
‘अभंग तुकाराम’ हा फक्त एक चित्रपट नव्हता —
तर तो होता संतविचारांचा, भक्तीचा आणि समाजाला दिशा देणाऱ्या संस्कारांचा जिवंत प्रवास!
