मांजरी ता.७: आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत. यामध्ये संदेश आव्हाळे सोशल फाउंडेशनच्या वतीने अयोध्या काशी विश्वनाथ यात्रेचे आयोजन करण्यात आले असून कोमल आव्हाळे यांच्या भक्तीची पहिली रेल्वे हडपसर पुणे येथून नुकतीच धावली. या देवदर्शन यात्रेच्या पहिल्या टप्प्यातील रेल्वेचे आज दुपारी हडपसर येथील रेल्वे स्थानकातून प्रस्थान झाले. थोरामोठ्यांचे आशीर्वाद व मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद गटातील युवक तरुण यांच्या सहकार्यातून या यात्रेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी सरपंच संदेश आव्हाळे मित्र परिवाराने दिली.
आव्हाळवाडी थेऊर जिल्हा परिषद गटातुन त्यांनी आपल्या मायबाप जनतेला मोफत अयोध्या काशी विश्वनाथ दर्शन यात्रेचे आयोजन केले. नुकतेच हडपसर रेल्वे स्थानकातुन आव्हाळे यांनी हजारो नागरिकांना आपल्या सोबत घेऊन या यात्रेला सुरुवात केली.
संदेश आव्हाळे सोशल फाउंडेशन व कोमल आव्हाळे यांच्या वतीने आयोजित केलेल्या अखंड भक्ती यात्रेच्या प्रस्थानप्रसंगी हडपसर स्टेशन येथे वडगा़व शेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत रेल्वेची पुजा करुन हिरवा कंदील दाखवला.
अयोध्या व काशी विश्वनाथ धामाच्या दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना यात्रेसाठी शुभेच्छा देत भक्तीमार्गावरचा हा प्रवास प्रत्येकाच्या मनात श्रद्धा, शांती आणि समाधान घेऊन येवो अशी प्रार्थना आमदार पठारे यांनी केली. सेवाभावी वृत्ती असलेल्या कोमल आव्हाळे यांना जनतेचा उदंड प्रतिसाद व आशीर्वाद लाभेल आणि त्यांची राजकीय स्वप्ने जनता जनार्दन पूर्ण करेल असा विश्वास आमदार बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केला.
यामध्ये आव्हाळवाडी येथील माजी सरपंच संदेश आव्हाळे यांनी आपल्या पत्नीला या निवडणुकीच्या आखाड्यात उतरवले असुन त्यांनी मतदार संघात अयोध्या,काशी विश्वनाथ दर्शन यात्रेचे आयोजन करुन निवडणुकीपूर्वीच प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांनी मतदारांच्या घरापर्यंत संपर्क साधुन या यात्रेसाठी अर्ज भरून घेतले. दिवाळी निमित्त शुभेच्छा भेट देऊन आपणच या जागेसाठी प्रबळ दावेदार असल्याचे सांगत जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोमल आव्हाळे यांनी मतदार संघातील गाव वाड्या वस्त्यांवर जात जनसंपर्क वाढवला आहे. कोमल आव्हाळे या आव्हाळवाडी ग्रामपंचायतच्या विद्यमान सदस्य असुन विविध विकासकामांचा अनुभव आहे. महिला सबलीकरण योजनांच्या माध्यमातून महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत.
महिला माता भगिनी,आबालृद्ध, मायबाप जनतेच्या आशीर्वादाने अयोध्या व काशी विश्वनाथ दर्शन यात्रेचे आयोजन करुन या दर्शनासाठी सर्वसामान्य जनता जनार्दनास घेऊन जाण्याचे माझे स्वप्न पूर्ण होत असून हे जनतेचे प्रेम आणि मायेची शिदोरी सोबत घेऊन आम्ही काशी विश्वनाथ व प्रभू श्रीरामचंद्राच्या दारी जात आहोत असे माजी सरपंच संदेश आव्हाळे यांनी सांगितले.
होऊ घातलेल्या या जिल्हा परिषद निवडणुकीत कोमल संदेश आव्हाळे ह्याच या जागेच्या प्रबळ दावेदार असून त्या प्रचंड बहुमताने निवडून येतील असा आत्मविश्वास येथील उपस्थित यात्रेकरूंनी व्यक्त केला.
