प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
पुणे ता.१५: जागतिक स्तरावर वेगळी ओळख असणारी दोन महानगरे महाराष्ट्रात आहेत त्यापैकी एक मुंबई आणि दुसरे पुणे आहे त्यामुळे या शहरांचा शाश्वत विकास करण्याची जबाबदारी ही सरकारची आहे पुणे हे महाराष्ट्राचे ग्रोथ इंजिन आहे त्यामुळे आम्ही पुण्याला काही कमी पडून देणार नाही अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात दिली.
गणेश कला क्रीडा केंद्र पुणे येथे गतिमान पुण्यासाठीच्या 3000 कोटी रुपयांच्या तब्बल ५३ विविध विकास कामांचे उद्घाटन,लोकार्पण आणि भूमिपूजन व पुणे मेट्रोच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा शुभारंभ सोमवार (ता.१५) रोजी पार पडला.
या दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च व तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे राज्यमंत्री माधुरी मिसाळ विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे आमदार चेतन तुपे, बापूसाहेब पठारे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुल कुंडवार जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर पुणे मनपा आयुक्त नवल किशोर राम आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, पुणेकरांनी मेट्रोला चांगला प्रतिसाद दिला आहे त्यामुळे नागपूरच्या धरतीवर आता हडपसर पासून यवतपर्यंत उड्डाणपूल आणि त्यावर मेट्रो धावणार आहे वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन या सर्व सुविधा या पुण्याला पुरविण्यात येणार आहेत.
पुणे शहराच्या पायाभूत विकासाला योग्य दिशा आणि आवश्यक गती देण्यासाठी सरकार म्हणून आम्ही जवळपास ४०,००० कोटी रुपयांची विकासकामे हाती घेतली आहेत. शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय म्हणून मेट्रोचे जाळे अधिक विस्तारले जात असून, ही कामे करताना पुढील ५० वर्षांचा दूरगामी विचार, AI तंत्रज्ञानाचा वापर आणि उच्च गुणवत्तेवर विशेष भर दिला जात आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होत असलेली पाण्याची समस्या लक्षात घेता, येत्या काळात टाटा समूहाच्या धरणांमधून पाणी उपलब्ध करून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. विकासकामांसोबतच शहरातील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करणेही तितकेच महत्त्वाचे त्यासाठी सरकार आणि प्रत्येक लोकप्रतिनिधीने काम करणं गरजेचं असल्याचं मत यावेळी व्यक्त केलं.
पुणे ग्रँड टूर या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेला निश्चितच चालना मिळणार असून, त्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणावर रस्ते विकास व शहर सुशोभिकरणाची कामे करण्यात येणार आहेत. तसंच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस खात्याला सरकारचे नेहमीच पूर्ण सहकार्य राहिले आहे आणि पुढेही राहील. पुणे शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित व सुसह्य जीवन मिळावे यासाठी पोलीस दलाने अधिक दक्षता घ्यावी, अशा सूचना या निमित्ताने पोलीस दलास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
येत्या काळात पुणे मेट्रोचा विस्तार सुमारे २०० किमीपर्यंत करण्याचा प्रस्ताव असून, त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही. शहरातील नागरिकांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हे सरकार नेहमीच तत्पर राहील, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
