प्रतिनिधी :- आशोक आव्हाळे
पुणे ता.११: पुणे-नगर रस्त्यावरील वाढती वाहतूक कोंडी, अपुऱ्या सुविधा, रस्त्यांची दुरवस्था व पादचारी मार्गांच्या असुरक्षित अवस्थेमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या वाहतूक संबंधित समस्यांवर तातडीने उपाययोजना व्हाव्यात यासाठी वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी महानगरपालिका प्रशासन, वाहतूक नियंत्रण विभाग, पुणे शहर वाहतूक शाखेकडे निवेदनाद्वारे मागण्या मांडल्या आहेत.
यापुर्वी येरवडा, शास्त्री नगर, कल्याणीनगर, रामवाडी, विमाननगर, टाटा गार्डन, खराडी बायपास, जनक बाबा दर्गा, युवान आयटी पार्क, खराडी जकात नाका या परिसरांमध्ये सिग्नल फ्री योजना अंमलात आणली आहे. त्यामुळे वाहतुकीचा वेग वाढला असला, तरी नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अनेक उपाययोजना प्रलंबित असल्याचे दिसून येते. याच पार्श्वभूमीवर बापूसाहेब पठारे यांनी मागणीद्वारे उपाययोजना सुचवल्या आहेत.
काय आहेत उपाययोजना:
१) बीआरटी मार्ग काढल्यानंतर विस्कळीत झालेला डिव्हायडर रस्त्याच्या मध्यभागी नेणे, ज्यामुळे रचना संतुलित व सुरक्षित होईल.
२) झेब्रा क्रॉसिंग, फूटपाथ व काही सेकंदाचे पादचारी सिग्नल यांची उभारणी.
३) डिव्हायडर सुरू होणाऱ्या ठिकाणी प्रतिबिंबित फलक
४) प्रमुख भागांकडे जाण्यासाठी दिशादर्शक फलक, रस्ता मार्गदर्शक सूचना फलक
५) विमाननगर व चंदननगर येथील भुयारी मार्गांची तातडीने दुरुस्ती, प्रकाशयोजना व साफसफाई
६) वाहतूक नियंत्रणासाठी स्मार्ट सिग्नल यंत्रणा
याशिवाय, दुसऱ्या निवेदनाद्वारे पठारे यांनी विमाननगर व चंदननगर येथील भुयारी मार्गांची अत्यंत खराब स्थिती अधोरेखित केली आहे. या भुयारी मार्गांची तातडीने दुरुस्त करून नागरिकांना सुरक्षित वापरासाठी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी महानगरपालिका मुख्य अभियंता यांच्याकडे केली आहे. या भुयारी मार्गांमध्ये प्रकाशयोजना अपुरी असून, स्वच्छतेचा अभाव आहे. त्यामुळे महिला, मुली, विद्यार्थीवर्ग तसेच वृद्ध नागरिकांना या मार्गांचा वापर करताना असुरक्षितता वाटते.
या मागण्यांबाबत बोलताना बापूसाहेब पठारे म्हणाले, की “वडगावशेरी मतदारसंघामधील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या दृष्टीने विविध माध्यमातून मी प्रयत्नशील आहे. वाहतूक कोंडी फोडून सुरळीत वाहतुकीसोबतच सुरक्षित वाहतूक असणेही गरजेचे आहे. मी मांडलेल्या मागण्यांचा विचार प्रशासन दरबारी होईल, ही खात्री आहे. वाहतूक व दळणवळण नागरिक बांधवांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्या दृष्टीने कोणतीही तडजोड होऊ नये.”