दोन सख्खे भाऊ तालुक्याच्या प्रमुख सहकारी संस्थेवर अध्यक्ष.
प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे
मांजरी ता.१९ : आशिया खंडातील सर्वात मोठ्या असलेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी प्रकाश चंद्रकांत जगताप यांची बिनविरोध निवड झाली. शुक्रवार (ता.१८) रोजी मार्केट यार्ड येथील बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. काही दिवसापूर्वी मावळते सभापती दिलीप काळभोर यांनी काही कारणास्तव आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याने सभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली. शुक्रवार (ता.१८) रोजी सहकार उपजिल्हा निबंधक प्रकाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या निवडणूक प्रक्रियेत सभापती पदासाठी प्रकाश चंद्रकांत जगताप यांचा एकमेव अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी सभापतीपदी जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, दौंडचे आमदार राहुल कुल व विकास दांगट यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. यादरम्यान प्रदिप कंद, दिलीप काळभोर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत जगताप यांचा सन्मान करण्यात आला.
हवेली तालुक्यात असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखाना व पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्षपदी दोन सख्खे भाऊ कार्यरत असल्याचा मोठा योग आला आहे. दिलीप काळभोर यांनी सभापतीपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोण होणार सभापती यावर अनेक तर्क वितर्क लढविण्यात आले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचून हे पद आपल्याला मिळावे म्हणून अनेकांनी धावपळ केली. संचालक मंडळातील विद्यमान १२ संचालकांनी प्रकाश जगताप यांना पाठिंबा दिल्याने त्यांचा सभापती पदाचा मार्ग मोकळा झाला होता. यामुळे जगताप यांनी बाजी मारत सभापतीपदावर पुनश्च एकदा आपले नाव कोरले. गेली २३ वर्ष प्रशासकीय राजवटीच्या ताब्यात असलेल्या या बाजार समितीला न्यायालयीन प्रक्रियेतून मुक्त करत या संस्थेला हवेली तालुक्याच्या कार्यक्षेत्रात आणून निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी प्रकाश जगताप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. जगताप यांनी आमदार राहुल कुल, जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), भाजपच्या सोबतीने सर्वपक्षीय पॅनलची रचना करत येथील सत्ता हस्तगत केली.
हवेली तालुक्यात दोन सख्खे भाऊ दोन महत्त्वाच्या संस्थांवर कशासाठी पाहिजे हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला होता. परंतु हा विरोध मोडून आपणच सहकारातील बादशहा असल्याचे दाखवून दिले.
जगताप सभापती झाल्याने यशवंत कारखान्याच्या जमीन खरेदीला बळ मिळेल अशी चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.
यादरम्यान माजी सभापती दिलीप काळभोर, उपसभापती दत्तात्रय पायगुडे, संचालक प्रशांत काळभोर, रोहिदास उंद्रे, राजाराम कांचन, रामकृष्ण सातव, संतोष आबासाहेब कांचन, शशिकांत गायकवाड, सुदर्शन चौधरी, नितीन दांगट, गणेश घुले, रवींद्र कंद, मनीषा हरपळे, सारिका हरगुडे, आबासाहेब आबनावे, गणेश घुले, अनिरुद्ध भोसले,संतोष नांगरे यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते.