प्रतिनिधी : आशोक आव्हाळे
मांजरी ता.१५: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रस्तावित टी पी स्कीम ला मांजरी खुर्द येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तीव्र विरोध केला आहे. या संदर्भात शेतकऱ्यांची बैठक मांजरी खुर्द येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नुकतीच पार पडली.या मध्ये सर्वच शेतकऱ्यांनी प्रस्तावित टी पी स्कीम ला विरोध दर्शवला व पीएमआरडीएने सदर प्रस्तावित टी पी स्कीम रद्द करावी अशा मागणीचा ठराव एकमताने सहमत केला. या स्कीम मुळे शेतकरी देशोधडीला लागतील ,त्यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नये अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली.
मांजरी खुर्द गावामध्ये पीएमआरडीए ची प्रस्तावित एक टीपी स्कीम आहे त्यामध्ये पाचशे ते साडेपाचशे एकर क्षेत्र समाविष्ट आहे, त्यानंतर आता परत आणखी तीन टि पी स्कीम नियोजित करण्यात आल्या , त्यामध्ये हजार ते बाराशे एकर क्षेत्र समाविष्ट करण्यात आले आहे. यामध्ये अनेकांचे उपजीविकेचे साधन हे शेती असून यावर कुऱ्हाड चालविली जात आहे. शेतकऱ्यांना विश्वासात न घेता किंबहुना शेतकऱ्यांची संमती नसताना देखील हि जमीन टीपी स्कीम मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.
तसेच सदर टीपी स्कीम साठी नेमका किती कालावधी लागणार आहे हे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले नसून यापूर्वी कुठलीही टीपी स्कीम यशस्वी झालेली नाही .सर्वात प्रथम असणारी माण माळुंगे टीपी स्कीम संदर्भात अजून कुठलीही हालचाल नसून असे असताना अजून इतर १५ टी पी स्कीम नियोजित करुन शासन नेमकं काय साध्य करत आहे. या संदर्भात शासनाकडे एखादे रोल मॉडेल आहे काय? असे विविध प्रश्न या बैठकीत शेतकऱ्यांकडून उपस्थित केले गेले.
यासंदर्भात बाधित शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन यापूर्वीच पीएमआरडीएकडे सुपूर्द करण्यात आले आहे. मांजरी खुर्द येथील प्रस्तावित टीपी स्कीम लवकरात लवकर वगळली जावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. शिवदीप उंद्रे, माजी उपसरपंच प्रकाश सावंत, माजी सरपंच सिताराम उंद्रे यांनी दिला आहे.