प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे
मांजरी ता.२९: नागपंचमीच्या निमित्ताने मंगळवार (ता.२९) रोजी मांजरी खुर्द येथील अण्णासाहेब मगर विद्यालयात
“साप समज-गैरसमज ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये जन जागृती करून सापांविषयी अंधश्रद्धा दूर करून वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे हा होता.
या कार्यक्रमाची प्रस्तावना विठ्ठल ढमे यांनी केल्यानंतर विद्यालयाचे क्रीडाशिक्षक सर्पमित्र अनिल चंद व मांजरी बुद्रुक येथील सर्पमित्र विनोद जाधव यांनी सर्पांच्या विविध प्रजाती, त्यांचे पर्यावरणातील महत्त्व व विषारी व बिनविषारी साप यामधील फरक ,ओळख व घ्यावयाची काळजी यावर सविस्तर माहिती दिली. त्यांनी प्रत्यक्ष सर्प दर्शवून विद्यार्थ्यांमध्ये सर्पांबद्दलची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला.
“लोक घाबरून सापांना मारतात, त्यामुळे सापांच्या प्रजाती नष्ट होत आहेत. प्रत्येक साप विषारी नसतो. विषारी साप कसा ओळखायचा, सापांचे प्रकार, सर्पांच्या विविध प्रजाती, साप चावल्यावर प्रथोमचार कसे करावे, साप समोर दिसला, तर काय करावे, याची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. सापांना मारू नका, असे आवाहन करतानाच जखमी पक्षी प्राणी दिसल्यास त्यांच्यावर उपचार करून त्यांना मदत करण्याचे आवाहन अनिल चंद व विनोद जाधव यांनी केले.”
यादरम्यान विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध प्रश्न विचारून शंका, निरसन व आपली उत्सुकता व्यक्त केली. काही विद्यार्थ्यांनी सर्पमित्र यांच्या मदतीने साप हाताळणी केली. सर्पमित्र अनिल चंद यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत सांगितले की, “सर्प हे निसर्गाचे आवश्यक घटक आहेत. त्यांच्याबद्दल अज्ञानामुळे निर्माण झालेल्या गैरसमजुती दूर करणे हीच खऱ्या अर्थाने नागपंचमी साजरी करण्याची पद्धत आहे.”
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांना ‘सर्पसंवर्धन शपथ’ देण्यात आली. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, पालक,विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उपक्रमाचे स्वागत करत भविष्यात अशा शैक्षणिक उपक्रमांचे सातत्य ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त केली.