प्रतिनिधी : – भगवान खुर्पे
तळेगाव ढमढेरे परिसरातील ऊस उत्पादक पट्ट्यामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने , हुमणी ही बहुभक्षी कीड उपद्रवी ठरत आहे. त्यामुळे ऊस पीक उत्पादनात घट होते. या किडीच्या नियंत्रणासाठी जैविक कीडनाशक हा पर्यावरण पूरक शाश्वत पर्याय पिकांना वाचविण्यासाठी वरदान ठरणार असल्याचे मत शास्त्रज्ञ डॉ. दत्तात्रय गावडे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी व्यक्त केलेआहे. ते पुढे म्हणाले की तळेगाव ढमढेरे शेतकरी उत्पादक कंपनीने उत्पादित केलेल्या जैविक निष्ठा उत्तम दर्जाच्या असून त्याचा वापर करून कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन घेणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी त्याचा वापर वाढवणे गरजेचे आहे.अध्यक्षीय भाषणात तालुका कृषी अधिकारी श्रीमती सुवर्णा आदक यांनी तळेगाव ढमढेरे येथील शेतकरी उत्पादक कंपनी शेतकऱ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्त्रोत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा पुणे व तळेगाव ढमढेरे शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव ढमढेरे येथे शेतकरी उत्पादक कंपनीच्या कार्यालयात गुरुवार दिनांक 26/06/2025 रोजी सकाळी दहा वाजता शेतकरी प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
तळेगाव ढमढेरे व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.श्री दत्तात्रय ग्रावडे शास्त्रज्ञ केवीके नारायणगाव व श्रीमती सुवर्णा आदक तालुका कृषी अधिकारी शिरूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.ऊस व्यवस्थापन हुमणी नियंत्रण व सेंद्रिय शेती संकल्पना या विषयावर झालेल्या कार्यक्रमात आकाश सावंत यांनी शाश्वत शेतीसाठी 10 ड्रम युनिट चे महत्व सांगत कमी खर्चात अधिक उत्पादन वाढविण्याचा फॉर्मुला विशद केला, तसेच तळेगाव ढमढेरे शेतकरी उत्पादक कंपनीने तयार केलेली विविध उत्पादने कमी खर्चामध्ये फायदेशीर ठरत असल्याचे विशद केले. आपल्या भागात जास्तीत जास्त फळबाग लागवड वाढवण्याचे आमचे संस्थेचे ध्येय असल्याचे विवेकानंद लभाने यांनी सांगितले, कमी खर्चात घरच्या घरीच तयार करा ऊस सुपर केन नर्सरी या विषयावर प्रशांत दोरगे यांनी माहिती दिली कृषी विभागाच्या विविध योजना अशोक जाधव यांनी या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुधीर गायकवाड सूत्रसंचालन घनश्याम तोडकर यांनी केले तर आभार गोपाळ भुजबळ यांनी मानले…