प्रतिनिधी :- भगवान खुर्पे
तळेगाव ढमढेरे, दि. २६,
खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘हुतात्मा शिवराम हरी राजगुरू राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेत’ तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालयाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.
सदर स्पर्धा वरिष्ठ व कनिष्ठ अशा दोन गटात घेण्यात आलेली असून स्पर्धेचे हे ३४ वे वर्ष होते. स्पर्धेत राज्यभरातून तब्बल ८९ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे. दोन्ही गटातील विजेत्यांना करंडक व प्रमाणपत्रासह रोख रकमेचे पारितोषिक प्रदान करण्यात आले. या स्पर्धेत साहेबराव शंकरराव ढमढेरे कला व वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षात शिकत असलेला विद्यार्थी चि.संकेत लक्ष्मण वडघुले हा तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला आहे. सदर स्पर्धेसाठी ‘मार्गदर्शक शिक्षक’ म्हणून महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रमोद पाटील यांनी काम पाहिले.
राज्यस्तरीय स्पर्धेत संपादित केलेल्या या यशाबद्दल विद्यार्थी संकेत वडघुले व प्रा.डॉ. प्रमोद पाटील यांचे शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरे संस्थेचे संचालक महेशबापू ढमढेरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अर्जुन मुसमाडे, उपप्राचार्य डॉ.पराग चौधरी व सर्व शिक्षकवृंदांनी अभिनंदन केले आहे.