दोन जिल्हा परिषद गटात तळेगाव ढमढेरे गावची विभागणी न करता एकसंघ ठेवण्याची विशेष ग्रामसभेत एकमुखी मागणी.
प्रतिनिधी : – भगवान खुर्पे
तळेगाव ढमढेरे दि.18 (वार्ताहर) नवीन आराखड्यानुसार तळेगाव ढमढेरे गावाची दोन जिल्हा परिषद गटात विभागणी झाल्याने तळेगाव ढमढेरे येथील नागरिक व मतदार संतप्त झाले असून प्रशासनाने तयार केलेल्या नवीन प्रारूप आराखड्याचा विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी तीव्र निषेध केला.
आज गावबंदची हाक देण्यात आली होती.यामध्ये गावातील अत्यावश्यक सेवा वगळता पुर्णपणे बाजार पेठ कडकडीत बंद ठेवून या निषेध मोर्चाला उत्स्फूर्त पाठिंबा दिला.सकाळी 10 वाजता गावाच्या मुख्य प्रवेशद्वारात हनुमान मंदिरासमोर गावातील सर्व नागरिकांनी एकत्र येऊन निषेध मोर्चा प्रारंभ केला. प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांनी हातात फलक व काळे झेंडे घेऊन घोषणा देत बाजारपेठेमार्गे ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढली.
यामध्ये गावातील सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी वर्ग, नोकरदार,महिला व युवा वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायत समोर ग्रामपंचायतचे वतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच कोमल शिंदे होत्या.यावळी ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी सभेचे प्रास्ताविक केले व विषयाची माहिती सांगितली.ब्रिटिश कालीनकाळापासून तळेगाव ढमढेरे गावाला एक ऐतिहासिक ओळख असून जिल्हा परिषद स्थापनेपासून तळेगाव ढमढेरे हा जिल्हा परिषद गट राहिलेला आहे.
तळेगाव ढमढेरे गावाला नवीन प्रारुप आराखड्यामध्ये दुय्यम स्थान देण्यात आले आहे.तसेच नवीन आराखड्यानुसार तळेगाव ढमढेरे गावाची सणसवाडी व शिक्रापूर या दोन जिल्हा परिषद गटामध्ये विभागणी केल्याने ग्रामस्थांनी ग्रामसभेत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. व सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या भाषणात तळेगाव ढमढेरे गाव एकसंघ रहावे.अशी मागणी मागणी केली.विशेषता प्रथमच सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्र आल्याने सभेला विराट सरूप आले होते.दोन जिल्हा परिषद गटात तळेगाव ढमढेरे विभागणी केली आहे. ती न करता एक संघ ठेवण्यात यावे.तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गट व्हावा असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला .