पुणे : निवृत्त न्यायाधीश किरण सातारकर यांच्या “विस्परिंग नेचर’ या निसर्ग चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार विलास कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे
पुणे, ता. २६ : निसर्गातील विविधतेशी हितगुज करीत हौशी चित्रकार व निवृत्त न्यायाधीश किरण सातारकर यांनी गेल्या आठ वर्षांत रेखाटलेल्या “विस्परिंग नेचर’ या निसर्ग चित्र प्रदर्शनाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बाल गंधर्व कलादालनात आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार विलास कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
संस्कार भारतीचे उल्हास जोशी, ॲड. मुकुंद ननवरे, अतुल नाईक, बाळासाहेब राऊत, समीर नाईक, अनुराधा सातारकर, तन्मय सातारकर, अवनी सातारकर आदी यावेळी उपस्थित होते. जितेंद्र वायकर यांनी सूत्रसंचालन केले.
सातारकर हे निवृत्त न्यायाधीश असून लहानपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. संस्कार भारतीच्या संपर्कात आल्यावर ती आवड जोपासली. निवृत्तीनंतर त्यांनी भटकंती केली, वाचन केले, रोटरीक्लबमध्ये काम केले. या काळात निसर्ग चांगल्या प्रकारे त्यांना वाचायला मिळाला. सुरुवातीला जलरंगामध्ये अनेक चित्रे त्यांनी रेखाटली. त्यानंतर अॅक्रीलिक रंगातही अनेक निसर्ग चित्रे त्यांनी रेखाटली. यातील निवडक शे-दीडशे चित्रे त्यांनी प्रदर्शनात ठेवली होती.
प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ चित्रकार कुलकर्णी म्हणाले , “कलेसाठी शिक्षण वय स्थळ काळाची आवश्यकता नाही. त्यामध्ये प्रतिभा शक्ती महत्त्वाची आहे. त्यामुळेच चित्रकार सातारकर यांनी जबाबदारीची नोकरी सांभाळत आपल्या कलेला वाव दिला. आपल्याला उपजत मिळालेल्या या देणगीचा त्यांनी अतिशय खुबीने वापर केला आहे. जलरंगातील चित्रे रेखाटताना चुकांना माफी नसते, हे खरे असले तरी जलरंगातील चित्रे आपल्याला अधिकाधीक काटेकोरपणाही शिकवतात. त्यामुळे सातारकरांनी त्यातही अधिकाधिक चित्रे रेखाटावीत.’
चित्रकार सातारकर म्हणाले, “धकाधकीच्या जीवनात नोकरी व व्यवसाय आपल्याला तारून नेतात, पण अखंड आयुष्य एखादा चांगला कलाछंदच तारू शकतो. छंदाची अनुभूती आली की वृत्तीही साधकाची होते. या प्रदर्शनात मी निसर्गाच्या विविध रूपांचे चित्रण मांडले आहे. मला जे भावले त्यापेक्षाही वेगळे आपण रसिकांना भावेल, अशी खात्री आहे.’
…………………………….
