३ लाख ८३ हजार रुपये किंमतीचे एकूण १५ मोबाईल, खराडी पोलिसांची कामगिरी
प्रतिनिधी : – अशोक आव्हाळे
मांजरी ता.२९: खराडी, पुणे व परिसरातील नागरिकांचे गहाळ झालेले ३ लाख ८३ हजार रुपये किंमतीचे एकूण १५ मोबाईलचा शोध घेऊन खराडी पोलिसांनी ते नागरिकांना परत केले. पोलिसांनी आपला मोबाईल शोधून परत मिळाल्याने नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. त्याबद्दल नागरिकांनी खराडी पोलीस स्टेशनच्या पोलिसांचे कौतुक करून आभार मानले.
काही दिवसापूर्वी खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणाऱ्या रहिवाशांनी त्यांचे मोबाईल गहाळ झाल्याबद्दलच्या तक्रारी खराडी पोलीस स्टेशनला दिल्या होत्या. खराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रहिवाशांचे मोबाईल गहाळ होण्याचे प्रमाण वाढले होते. त्या अनुषंगाने खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी गहाळ मोबाईल फोनचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या. वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व आदेशान्वये पोलीस निरीक्षक ( गुन्हे) विश्वजीत जगताप, तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे, पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व तपास पथकात मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाचे कामकाज करणारे पोलीस अंमलदार सुरज जाधव, सायबर पथकातील पोलीस उपनिरीक्षक श्रीमती माधुरी बिडवे व सायबर तपास पथक अंमलदार यांनी तपास हाती घेतला होता.
त्यानुसार खराडी पोलीस ठाण्यात दाखल गहाळ मधील मोबाईल फोनचे बुद्धी कौशल्याने व तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस ठाणे हद्दीतील तसेच इतर जिल्ह्यातील नांदेड सोलापूर अहिल्यानगर तसेच उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार या राज्यातून शोध घेऊन एकूण ३ लाख ८३ हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकूण १५ मोबाईल फोनचा शोध घेऊन ते प्राप्त करण्यात तपास पथक व सायबर पथकास यश प्राप्त झाले असून सदर फोन नागरिकांना परत करण्यात आले आहेत. नागरिकांना त्यांचे मोबाईल परत मिळाल्यामुळे त्यांनी खराडी पोलीस स्टेशनचे कौतुक करून आभार मानले.
सदरची कामगिरी ही मनोज पाटील,अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, पोलीस उपायुक्त परिमंडळ ४ सोमय मुंडे, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण ,खराडी पोलीस स्टेशन पुणे शहर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विश्वजीत जगताप, सपोनि रवींद्र गोडसे, पोउनि राहुल कोळपे, तपास पथकातील पोलिस अंमलदार महेश नाणेकर, सुरेंद्र साबळे, श्रीकांत शेंडे, वशिम सय्यद, सुरज जाधव, श्रीकांत कोदरे, जयवंत श्रीरामे,विलास केदारी,सायबर तपास पथकातील महिला पोलिस अंमलदार श्रीमती प्रतिमा पवार यांनी केली आहे.