प्रतिनिधी :- नूतन पाटोळे
1) आहारातील कढी, आमटी, पोहे यांची चव वाढवण्यासाठी कडीपत्त्याची पानं नेहमी उपयोगात आणावीत. ही पानं पाचक असल्यामुळं भूक वाढते आणि घेतलेला आहार पचण्यासाठी मदत होते.
2) कढीपत्त्याच्या पानात पालक, मेथी, कोथिंबीर या भाज्यापेक्षा अ जीवनसत्व जास्त प्रमाणात असतं. इतर भाज्यांपेक्षा या पानात कर्बोदकं आणि प्रथिनांचं प्रमाण सुधारणत: दुप्पट असतं.
3) बालकांच्या पोटात जंत किंवा कृमी झाले असतील तर त्यांना कढीपत्त्याची पानं बारीक वाटून त्याचा कल्क तयार करावा आणि या कल्कात समप्रमाणात गूळ आणि मध एकत्र करून त्याची छोटी गोळी बनवावी. ही गोळी सकाळ संध्याकाळ 2-2 या प्रमाणात द्यावी. यामुळं पोटातील कृमी नाहीसे होतात.
4) कढीपत्ता हा शीतल गुणधर्माचा असल्यानं जुलाब आणि उलट्या होत असेल किंवा त्यातून रक्त पडत असेल तर कढीपत्त्याची पान पाण्या सोबत वाटून हे पाणी गाळून घ्यावं. 1-1 चमचा या प्रमाणात 2-3 तासांच्या अंतरानं हे पाणी प्यावं. यामुळं उलटी कमी होऊन रक्तस्त्राव थांबतो.
5) मूळव्याधीतून रक्त पडत असेल तर कढीपत्त्याच्या पानांचा काढा बनवून तो प्यावा. यामुळं रक्त पडणं थांबतं.
6) अपचन, अरूची, अग्निमांद्य (भूक कमी होणं) ही लक्षणं जाणवत असतील तर कढीपत्त्याची 2-3 पानं चावून खावीत. यामुळं बेचव तोंडाला रूची निर्माण होऊन भूक लागण्याची जाणीव निर्माण होते.
7) पोटात जर मुरडा येत असेल तर तो कमी करण्यासाठी कढीपत्त्याची पानं चावून खावीत.
8) लघवीला जळजळ होऊन थेंब थेंब होत असेल तर अशा वेळी कढीपत्त्याच्या पानांच्या रसात सुती कपड्याच्या घड्या बनवून ओटीपोटावर ठेवाव्यात. यामुळं शरीरातील उष्णता कमी होऊन लघवीची जळजळ थांबते.
9) शरीरावर विषारी कीटकाच्या दंशानं सूज आली असेल तर कढीपत्त्याची पानं वाटून त्यावर त्याचा लेप लावावा. यामुळं सुज उतरते.
10) शरीरावर झालेली जखम भरून येत नसेल तर तसंच त्वचेवर पुरळ उठून खाज येत असेल तर कढीपत्त्याची पानं वाटून त्याचा कल्क शरीरावर चोळावा आणि जखमेवर लावावा.