मुरकुटे पंचायत समितीच्या प्रबळ दावेदार.
प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.२: आगामी पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आव्हाळवाडी कोलवडी गण क्रमांक ८० या पंचायत समिती गणासाठी कोलवडी येथील विकास सोसायटीचे व्हा. चेअरमन व साई गणेश ना. सह. पतसंस्थेचे अध्यक्ष संतोष ऊर्फ आप्पासाहेब मुरकुटे यांच्या सुविद्य पत्नी सुषमा संतोष मुरकुटे या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) कडुन प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. वाघोली येथे पक्षाच्या झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान उपस्थित मान्यवरांकडे त्यांनी उमेदवारीची मागणी केली आहे. गणेशोत्सव ,नवरात्र उत्सव व दिवाळी सणाच्या पावन मुहूर्तावर मतदार संघातील सर्व घरापर्यंत पोहोचून त्यांना मिठाईचे वाटप करत त्यांच्याशी संपर्क साधुन त्यांचे आशीर्वाद घेतले. यामध्ये आबालवृध्द व युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आव्हाळवाडी गण हा सर्व साधारण महिलांसाठी राखीव झाल्याने सुषमा मुरकुटे या गणासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहे.
या आपल्या गणातील मायबाप जनतेला अध्यात्मिक धार्मिक समाधान मिळावे व समाजात एकात्मतेचा चांगला संदेश जावा या हेतूने त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीने मोफत तुळजापूर व येडेश्वरी मातेचे देवदर्शन यात्रेचे भव्य आयोजन केले होते. साधारण ४५ बसच्या माध्यमातून दोन हजारापेक्षा जास्त मायबाप जनतेला देवदर्शन घडवून आणले. यादरम्यान यात्रेतील प्रत्येक भाविकांशी संवाद साधत त्यांचे आशीर्वाद घेतले. थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाखाली या गणातील युवकांच्या सहकार्यातून या भव्य दिव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या गणातील प्रत्येक गावातील वाडी वस्ती वरती बस उपलब्ध करून या सर्वांना देवदर्शन घडून आणण्यात सुषमा मुरकुटे यशस्वी झाल्या.
या यात्रेनिमित्त माहिती देताना आप्पासाहेब मुरकुटे यांनी सांगितले की, आपल्या पंचायत समिती गणातील भाविकांना तुळजापूर व येडेश्वरी मातेच्या दर्शनाचा लाभ मिळावा हीच आमची प्रेरणा असुन भाविकांना याचे समाधान मिळावे व लोकांची सेवा करण्याची संधी मिळावी. तसेच यानिमित्त समाजाला एकात्मतेचा व अध्यात्मिक चांगला संदेश मिळावा. राजकारण करत असताना समाजकारण केले गेले पाहिजे लोकांच्या अडीअडचणी सोडविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाईल.
या गणातील गावांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ही निवडणूक लढण्यास तयार आहे. तसेच महिला सबलीकरणासाठी काम करत महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे इच्छुक उमेदवार सुषमा मुरकुटे यांनी सांगितले.
सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असलेल्या सुषमा मुरकुटे यांनी स्वकष्टाने उद्योग व्यवसायात प्रगती केली असून आपल्या पतीच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यकारी सोसायटी व पतसंस्थेच्या माध्यमातून नागरिकांना मदत करण्याचा सतत प्रयत्न करत आहे. मुरकुटे यांना या गणातुन नागरिकांनी या यात्रेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने त्यांना विजयाची खात्री निर्माण झाली आहे.
