प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.१६:पुणे जिल्ह्यातील सहकारी व खासगी साखर कारखान्यांची धुराडी फेटली असून गाळप हंगाम २०२५/२६ ला सुरुवात झाली आहे. यामध्ये मोजक्याच कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली आहे. दसरा दिवाळीच्या मुहूर्तावर मुळी पुजन होऊन गाळप हंगाम सुरू झाला असून अद्याप शेतकऱ्यांच्या उसाचा दर, बाजारभाव अजुन जाहीर करण्यात आलेला नाही. या संदर्भात पुणे जिल्ह्यात रयत शेतकरी संघटनेने आक्रमक पवित्रा घेत वास्तविक ऊस गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी उसाचा भाव जाहीर करणे बंधनकारक असताना यावर कुठल्याही स्वरुपाचा निर्णय न घेता साखर कारखान्याने चालू करून कार्य क्षेत्रात ऊस तोडणी सुरू झाली आहे. तरी पण चालु हंगामातील ऊसाचा बाजार भाव जाहीर केलेला नाही.
शेतकऱ्याच्या ऊसाला एका टनाला साडेतीन हजार रुपये बाजार भाव जाहीर करावा अन्यथा श्रीनाथ म्हस्कोबा सहकारी साखर कारखान्यासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभे करू असा इशारा रयत शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. या संदर्भातील लेखी स्वरुपातील निवेदन कारखान्याचे एम डी यांना देण्यात आले आहे. यावेळी रयत शेतकरी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष, प्रदेश उपाध्यक्ष रामदास कोतवाल, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस अंकुश हंबीर, दौंड विधानसभा प्रवक्ते संपत हंबीर आदी उपस्थित होते.
देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर वाढले असून इथेनॉल, वीजनिर्मितीसह उपपदार्थांनाही चांगला भाव मिळत आहे. साखर कारखान्यांना खरंच प्रतिटन तीन हजार ५०० रुपये दर देणे शक्य आहे, असे सर्वच शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे मत आहे. दर देता येत नाही, अशी नकारघंटा लावण्यापेक्षा शेतीच्या वाढत्या उत्पादन खर्चाचा कारखाना व्यवस्थापनाने विचार करून दराची घोषणा करावी, अशीही संघटनेची भूमिका आहे.
कारखान्यांनी साखर उतारा चोरल्यामुळे एफआरपी कमी झाली आहे. सध्या देशात आणि अंतरराष्ट्रीय बाजारपेठेत साखरेचे दर वाढले आहेत. इथेनॉलचेही दर वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर कारखान्यांनी तीन हजार ५०० रुपये प्रतिटन दर दिला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची ठोस भूमिका आहे. तो दर देता येतो, असेही कृषितज्ज्ञांचे मत आहे. शेतकरी संघटना दरावर ठाम असून आक्रमकही झाल्या आहेत. त्यामुळे कारखानदारांची भूमिका काय असणार, दराचा निर्णय ते कसा घेणार, हा प्रश्न सुटणार की वाढणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाले आहेत.
