प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.३: आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद व महानगरपालिकांच्या निवडणुका अवघ्या काही दिवसात जाहीर होतील. या निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात अयोध्या, काशी, उज्जैन, तुळजापूर अशा अनेक धार्मिक स्थळांचे मतदारांना मोफत देवदर्शन यात्रेचे आयोजन करुन निवडणुकीपूर्वीच प्रचारात आघाडी घेण्याचा प्रयत्न केला आहे. यानिमित्ताने मतदार राजाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा आटोकाट प्रयत्न हे उमेदवार करताना दिसत आहेत. आत्ताच्या या इलेक्शनमध्ये उमेदवारांनी नेतेमंडळींना डावलत तळागाळापर्यंत जाऊन प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. या निवडणुकीत विकास कामांची उद्घाटने अथवा विकासाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लढणे अपेक्षित असताना हवेलीत विकासाचा पॅटर्न मात्र विकास कामे व मूलभूत समस्यांपेक्षा तालुक्यात आता मतदारांना मौज मजा घडविण्यात सत्ताधारी व विरोधक कामाला लागले आहेत. इच्छुकांनी मतदारांची हाऊस भागविण्यासाठी देवदर्शनवारी तसेच पर्यटना वर भर दिला आहे. अनेक गावात विविध विकास कामांच्या समस्या मोठ्या प्रमाणात आजही भेडसावत आहे. विजेचा लपंडाव, वाहतूक कोंडी, कचरा, रस्त्यांची दुरवस्था,स्वच्छतागृह आरोग्याच्या समस्या आजही भेडसावत आहे. परंतु या समस्यांवर तोडगा काढण्याची मानसिकता या इच्छुकांमध्ये नसून त्यांनी मतदारांची हौस भागवून निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. पूर्वी विकास कामांच्या जोरावर मतदान मागितले जायचे आत्ता या धार्मिक यात्रेच्या निमित्ताने मतदारांना प्रलोभन दाखवून आपण ही सेवा करत असल्याचे भासविले जात आहे. या यात्रेकरिता संपूर्ण रेल्वेच बुकिंग केली जात असुन प्रवास खर्च, भोजन इत्यादी साठी लागणारा खर्च उमेदवारांकडूनच केला जात आहे. काहींनी बस बुकिंग करून देवदर्शन यात्रा पूर्ण केल्या आहेत. मतदारसंघातील प्रत्येक इच्छुक उमेदवाराच्या देवदर्शन यात्रेचा लाभ मतदार घेत आहेत. कोणी नाराज व्हायला नको म्हणून प्रत्येक यात्रेला जायचं असा संकल्पच नागरिकांनी केला आहे. सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी मतदारांना देवदर्शन घडविले असले तरी देव नेमका कोणाला पावणार? असा प्रश्न उपस्थित होतो. कारण सत्ताधारी व विरोधक या दोघांनी मतदारांना देवदर्शन यात्रा घडवून आणली आहे. मतदारांना देवदर्शन घडवत असताना प्रत्येकाला आपण यानिवडणुकीसाठी प्रबळ दावेदार असल्याचे सांगितले जात असुन आपणच निवडून येणार एवढा आत्मविश्वास प्रत्येकाला वाटत आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांनी मतदारांशी संपर्क ठेवला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्याने इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
स्थानिक नेतेमंडळींना डावलत थेट मतदारांपर्यंत यंत्रणा राबवून निवडणुका जिंकणे हाच इच्छुकांचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होत आहे.
