थेऊर गणात चुरस तर सर्व पक्षांची भूमिका अस्पष्ट
प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.१९: आगामी जिल्हा परिषद निवडणूकीत नव्याने तयार झालेल्या आव्हाळवाडी थेऊर जिल्हा परिषद गटाचे आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला पडल्याने अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या आधीच गट संवेदनशील केला असून प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. इच्छुकांनी घरोघरी जाऊन प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क साधला आहे. काहींच्या प्रचाराच्या दोन फेऱ्या पुर्ण झाल्या आहेत. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या या गटावर दोन्ही राष्ट्रवादी व भाजपाने वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. परंतु येथील इच्छुकांनी आपण कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार हे जाहीर केले नाही.
या इच्छुकांनी पक्षाच्या वरिष्ठांना बाजूला ठेवून प्रचाराला सुरुवात केली आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते, राष्ट्रवादीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रदिप कंद, माजी आमदार अशोक पवार, भाजपचे नेते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रोहिदास उंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर या उमेदवार निवडीवर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे आहे.
या गटाची पहिलीच निवडणूक असल्याने गावोगावी राजकीय गटबाजींना वेग आला असून अनेकांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. जिल्हा परिषदेत पुढील पाच वर्षासाठी आपल्याच पक्षाची सत्ता हातात ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण रंगू लागले असून थंडीच्या वातावरणात ते अधिक तापण्याचे संकेत मिळत आहेत. अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून बसल्याचे दिसत आहे.
आव्हाळवाडी पंचायत समिती गण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाला असून येथून मोजक्याच महिला या जागेसाठी इच्छुक असल्याचे पाहायला मिळते. तसेच थेऊर गण हा सर्वसाधारण पुरुष प्रवर्गासाठी खुला झाल्याने येथील इच्छुकांची संख्या जास्त असल्याचे समजते.
अद्यापही या गटात व गणात कुठल्याही पक्षाने उमेदवार जाहीर केला नाही. आणि इच्छुकांनी ही कुठल्याच पक्षाला विचारात घेतलेले दिसत नाही. सभापती पदासाठी सर्वसाधारण गट राखीव झाल्याने सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. २०१७ नंतर तब्बल आठ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर होत असलेली ही निवडणूक राजकीय दृष्ट्या महत्त्वाची ठरणार आहे. सर्वसाधारण गणात निवडणूक अतिशय चुरशीची होणार आहे. उमेदवारी मिळवून तेथे विजयी होऊन सभापती पद घेण्यासाठी मोठी चढाओढ होणार आहे.
युती आघाडीवर संपूर्ण गणित अवलंबून असणार आहे. एकत्र लढती झाल्यास सरळ सामना दिसेल अथवा तिरंगी किंवा बहुरंगी लढती होतील. सर्वच पक्षांच्या उमेदवार निवडीच्या हालचाली सुरू असुन वरिष्ठांच्या गाठी भेटी चर्चा सुरू असल्याचेही समजते. आजपर्यंत कुठल्याही पक्षाने उमेदवार जाहीर केलेले दिसत नाही.
