मांजरी ता.२८ : आपल्या घराला घरपण देताना हा प्रापंचीक गाडा सांभाळताना महिला नेहमी कौटुंबिक जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असतात. माहेर, सासर यातील त्या भक्कम दुवा असतात. त्यामुळे दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून काही तरी मनोरंजनात्मक कार्यक्रम आपल्या महिला भगिनींसाठी व्हावेत म्हणून क्रांती नाना मळेगावकर यांच्या सोबत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे यशवंत सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष किशोर उंद्रे व माजी संचालक तुकाराम पवार यांनी सांगितले.
पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आव्हाळवाडी थेऊर जिल्हा परिषद गटातील उमेदवार कोमल संदेश आव्हाळे व पंचायत समितीच्या उमेदवार सुषमा संतोष आप्पा मुरकुटे तसेच माजी सरपंच, श्रावणबाळ संदेश आव्हाळे, साई गणेश ना.सह. पतसंस्थेचे चेअरमन संतोष आप्पा मुरकुटे यांनी खास महिलांसाठी सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर व बालगायिका टि व्ही स्टार सह्याद्री मळेगावकर यांचा न्यु होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन आव्हाळवाडी येथे भव्य दिव्य स्वरुपात केले होते. या कार्यक्रमाला हजारो महिलांनी उपस्थिती दर्शविली. या कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवर पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. एवढ्या थंडीतही विनोदी उखाणे, नृत्य आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रमाने महिलांमध्ये उत्साह संचारला होता.
सर्वांच्या सहकार्याने आज मी एवढी मोठी निवडणूक लढवण्याची संकल्पना केली असून मला सर्व गावातून खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळताना दिसतोय असे सुषमा मुरकुटे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
या दरम्यान बोलताना संदेश आव्हाळे म्हणाले की, माझी एक इच्छा होती की ,आपण काहीतरी पुण्याचे काम करायचं हे मनात ठरवलं, काशीला आपल्याला खरंतर आपल्या मुलांनी न्यायला लागतं त्या पद्धतीने मी तुमचा एक श्रावणबाळ झालो आणि तुम्हां सर्वांना त्या ठिकाणी काशी विश्वनाथाचे दर्शन त्या ठिकाणी मला देता आलं अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच काम करत असताना तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. या संघर्षाच्या काळात तुम्ही माझ्यासोबत आहात येणाऱ्या काळातील विकास हा तुमच्यासाठी असेल अशी ग्वाही दिली.
या कार्यक्रमावेळी उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉ काढण्यात आला. यामध्ये एक्टिवा, स्मार्टफोन, सोन्याची नथ, सायकल व पैठणी विजेत्या महिलांना देण्यात आली. त्याचप्रमाणे खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमात प्रथम क्रमांकाला न्यू होंडा एक्टिवा, द्वितीय फ्रिज, तृतीय वॉशिंग मशीन, चतुर्थ एलईडी टीव्ही आणि पाचवा ऑटो शेगडी अशी बक्षिसे देण्यात आली. या कार्यक्रमात सहभागी प्रत्येक महिलेस एक आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
next post
