प्रतिनिधी :- नूतन पाटोळे
शिरूर, पुणे :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी (आप) पुणे जिल्हा कोअर कमिटीची एक महत्त्वाची आढावा बैठक गुरुवारी, १८ सप्टेंबर २०२५ रोजी शिरूर येथील सद्गुरू हॉटेलमध्ये पार पडली. या बैठकीचे नेतृत्व आम आदमी पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष वैभव टेमकर यांनी केले. या बैठकीत पक्षाची आगामी रणनीती, संघटनात्मक बांधणी आणि उमेदवारांची निवड यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.
गेल्या काही महिन्यांपासून भाजप, शिवसेना आणि काँग्रेससारखे प्रमुख पक्ष निवडणुकीची तयारी करत असतानाच, आम आदमी पार्टीनेही आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. शिरूरमध्ये झालेल्या या बैठकीला जिल्हाध्यक्ष वैभव टेमकर यांच्यासह ज्येष्ठ कार्यकर्ते अशोक धुमाळ, पत्रकार निलेश जगताप, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत गाडेकर आणि सावळाराम आवारी, माजी शहराध्यक्ष अनिल डांगे, मनोज ढवळे, सुनील डांगे, माऊली बोबडे, गोविंद घोडे आणि इतर प्रगतशील शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत जिल्हाध्यक्ष वैभव टेमकर यांनी पक्षाला अधिक बळ देण्यासाठी आणि संघटनात्मक वाढीसाठी आवश्यक उपायांवर भर दिला. त्यांनी सांगितले की, सक्रिय कार्यकर्त्यांना योग्य तो मान-सन्मान आणि पद दिले जाईल. स्थानिक पातळीवरील निर्णय वरिष्ठांशी विचारविनिमय करून त्वरित घेतले जातील. तसेच, दर आठवड्याला एक बैठक घेऊन त्या बैठकींना आपण स्वतः उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘आप’ महाराष्ट्रात ‘एकला चलो रे’चा नारा देणार!
या बैठकीत बोलताना, आम आदमी पार्टीचे माजी शहराध्यक्ष अनिल डांगे यांनी एक अत्यंत महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पक्षश्रेष्ठींकडून आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याचे आदेश आले आहेत. यापुढे ‘आप’ महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांमध्ये स्वच्छ चारित्र्याचे उमेदवार देऊन स्वतंत्रपणे लढणार आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता, पण आता पक्षाने “एकला चलो” चा नारा दिला आहे.
या बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांनी शिरूरमधील विविध नागरी समस्यांवर आवाज उठवून सामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले. ‘आप’ने अल्पावधीतच सामान्य लोकांच्या मनात एक चांगले स्थान निर्माण केले आहे, असे मतही या बैठकीत व्यक्त करण्यात आले.
या आढावा बैठकीमुळे शिरूर शहर आणि पुणे जिल्ह्यातील आगामी निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीची वाढलेली सक्रियता दिसून येत आहे. ही बैठक पक्षाची पुढील वाटचाल आणि रणनीती निश्चित करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. ‘आप’ आता स्वबळावर मैदानात उतरल्याने आगामी काळात पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे.