मांजरी ता.०१: मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील अण्णासाहेब मगर विद्यालय तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धेमध्ये चार सुवर्ण व एक सिल्व्हर पदक मिळवून अव्वल स्थानी राहिले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा परिषद अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे तसेच सिद्धांचलम आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल वाडेबोल्हाई (ता.हवेली जि.पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या तालुकास्तरीय तायक्वांदो स्पर्धा २०२४ मध्ये मांजरी खुर्द येथील अण्णासाहेब मगर विद्या मंदिर शाळेतील खेळाडूंनी उज्वल यश संपादन केले. या स्पर्धेत १४ वर्षे वयोगटात गजानन जालिंदर जगताप याने २३ ते २५ किलो वजन गटात सुवर्णपदक, राहुल दीपक शेलार याने २५ ते २७ किलो वजन गटात सुवर्णपदक,सुजय अशोक नरूटे याने २७ ते २९ किलो वजन गटात सुवर्णपदक तसेच सोहम अंजीरराव कोल्हे याने ३२ ते ३५ किलो वजन गटात सुवर्णपदक मिळवले. तर १७ वर्षे मुलींच्या वयोगटात प्रगती शिवाजी पवार हिने ३५ ते ३८ किलो वजन गटात सिल्वर मेडल मिळवले असून या सर्व खेळाडूंची लांडेवाडी येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असल्याचे विद्यालयाचे क्रीडाशिक्षक अनिल चंद यांनी सांगितले. या सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक अनिल चंद व अच्युवर्स तायक्वांदो अकॅडमीचे सुरेश राठोड यांनी मार्गदर्शन केले. सर्व विजयी खेळाडूंचे शाळेच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.