प्रतिनिधी :- अशोक आव्हाळे
मांजरी ता.३१: थेऊर (ता. हवेली) येथून स्थलांतरित झालेल्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळावीत अशी मागणी थेऊरचे माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद माळी व मनसेचे हवेली तालुका संघटक प्रशांत खाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. येथील यशवंत सहकारी साखर कारखाना गेली ११ ते १५ वर्षापासून बंद पडलेला आहे. जेव्हा कारखाना चालू होता त्यावेळी येथे अनेक कामगार कारखान्याच्या कामगार वसाहतीमध्ये राहत होते. परंतु कारखाना बंद पडल्या नंतर सर्व कामगार त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित झालेले असून त्यांची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे. या स्थलांतरित झालेल्या कामगारांची नावे मतदार यादीतून त्वरित वगळण्यात यावीत. या कामगारांची त्यांच्या मूळ गावी देखील मतदार यादीत मतदार म्हणून नोंद आहे. हडपसर, वडगाव शेरी, कोंढवा, पुणे, बारामती, पुरंदर, इंदापूर तसेच महाराष्ट्रातील विविध मतदार संघात ही नावे आहेत. तसेच यातील काही लोक त्यांच्या त्यांच्या गावी सरपंच पदासह विविध पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे बाहेरील लोकांनी थेऊरगावचा सरपंच ठरवणे लोकशाहीत योग्य आहे का? अशा लोकांमुळे लोकशाहीची जगजाहीर हत्या होत आहे व स्थानिक मतदार व उमेदवारांवर अन्याय होत आहे असे या निवेदनात म्हटले आहे.
ज्या लोकांची येथील मतदार यादीत नावे आहेत पण ते गेल्या १० ते १५ वर्षांपासून गावात राहत नाही अशा स्थलांतरित मतदारांची बी एल ओ यांच्यामार्फत पडताळणी व पंचनामे करून दुबार नावे काढून टाकावी किंवा स्थलांतरित करावी, अशी मागणी विनोद माळी व प्रशांत खाडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. आता दुबार अथवा स्थलांतरित मतदारांची नावे प्रशासनाकडून कधी कमी केली जातील हे पहाणे तितकेच महत्त्वाचे आहे.